मुंबई : मागील दोन दिवसांपासून एनसीपी विरुद्ध एनसीबी हा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण नवाब मलिक यांनी एनसीबीच्या एका अधिकाऱ्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. तो अधिकारी कस्टम मधून एनसीबीला कसा येऊन बसला, त्यासाठी कुठल्या मंत्र्याच्या घरी लॉबिंग करण्यात आली, कुणाच्या बोलण्यावरून हा अधिकारी लोकांना भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे काढण्याचं काम करतो हे मी वेळ आली की लवकरच बाहेर काढणार आहे असं म्हंटल आहे. 


नवाब मलिक आज राज्यभरातील मंदिर सरकारने उघडी केल्यानंतर माहीम दर्गा येथे दर्शनासाठी आले होते त्यावेळी माध्यमांशी बोलत होते. याबाबत अधिक बोलताना नवाब मलिक म्हणाले की, काल एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रस्त्यावर पत्रकार परिषद घेऊन आम्हाला कोर्टात जाण्याचा सल्ला दिला परंतु त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी पूर्णपणे एनसीबीच्या कायद्याचा भंग केला आहे. त्यांनी मला उत्तर द्यावं की कुठल्या अधिकाराने त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना त्या क्रूझवर पकडलेल्या कार्यकर्त्यांना अटक करण्याचा अधिकार दिला. माझा स्पष्ट आरोप आहे हा अधिकारी केवळ प्रसिध्दीसाठी छापे टाकण्याचं काम करतो आहे. त्यामुळे आता देशात कायद्याचं राज्य आहे की नाही असा सवाल उपस्थित राहू लागला आहे. 


दरम्यान आज सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी होत असलेल्या कारवाई बाबत बोलताना नवाब मलिक म्हणाले की, ज्याप्रकारे अजित पवार यांच्या बहिणीच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. माझं म्हणणं आहे त्यांना जर माहितीचं पाहिजे होती तर ते खुलासे मागवू शकले असते. परंतु ज्याप्रकारे धाडी टाकण्यात आल्या आहेत यावरून स्पष्ट होत आहे की टार्गेट करून बदनाम करण्याचं काम भाजपकडून सुरू आहे. जी बंगालमध्ये परिस्थिती होती तीच परिस्थिती महाराष्ट्रात करू पाहत आहेत. त्यांना वाटतंय आम्ही घाबरून जाऊ पण आम्ही आणखी घट्ट होत आहोत. देशात कायद्याचं राज्य आहे की नाही असा सवाल उपस्थित होत आहेत. 


कारण भाजपचे कार्यकर्ते अधिकारी बनून कारवाई करतायत. माझा त्यांना सवाल आहे. कुठल्या अधिकारांनी मनीष भानुशालीने तथाकथित आरोपींना अटक केली. कोण आहे तो? पब्लिसिटीसाठी केवळ हे बॉलिवूड कलाकारांना अटक करत आहेत. मी प्रश्न उपस्थित केले आहेत त्याची कुणीचं उत्तरं देत नाही. त्यांनी लक्ष्यात घ्यावं आगामी काळात त्या अधिकाऱ्याला कस्टममधून आणून एनसीबीला कुणी बसवलं. कुठल्या नेत्याच्या घरी ही लॉबिंग झाली. कुणाच्या सांगण्यावरून हा अधिकारी नेमण्यात आला. कुणाच्या बोलण्यावरून हा अधिकारी लोकांवर धाडी टाकत आहे. लोकांना घाबरवून पैसे काढण्याचं काम करत आहेत. वेळ आली की मी सगळं बाहेर काढणार आहे. कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केली म्हणता मग आरोपी दुसऱ्याच्या ताब्यात दिलेच कसे? हा तर बेकायदेशीर प्रकार. एनसीबी कायद्याचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे या प्रकरणी बडतर्फची कारवाई करायला हवी.