मुंबई : राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे ज्यांनी उद्योग केला, त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये. त्यांच्या सल्ल्याची महाविकास आघाडी सरकारला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक बाजू सांभाळण्यास सक्षम आहोत. त्यांना कर्ज काढण्याचा सल्ला द्यायचा असेल तर त्यांनी कंपनी खोलली पाहिजे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत सांगत होते, केंद्र सरकारने महाराष्ट्राला 28 हजार कोटी रुपये दिले. विविध योजनांसाठी पैसा द्यावा लागतो आणि ते बंधनकारक असते. दिलेले पैसे नवीन योजनेसाठी खर्च करत नाही. पॅकेज दिले हे चुकीचे आहे. त्याचा फायदा राज्यसरकारला झालेला नाही. बंधनकारक पैसे सरकारला आणि जनतेला दिले आहेत. महाराष्ट्राने दीड लाख कोटीचे कर्ज काढले पाहिजे, असा सल्ला देवेंद्र फडणवीस देत आहेत. लोकं जगात, देशात, महाराष्ट्रात कर्ज काढण्यासाठी उत्सुक आहेत. तो त्यांचा उद्योग चांगल्या पद्धतीने चालेल, असा टोलाही नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
आम्ही महाराष्ट्राचे सरकार अस्थिर करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. परंतु महाराष्ट्रातील सरकार अस्थिर होऊच शकत नाही. तिन्ही पक्ष भक्कमपणे सरकार चालवत आहेत. हे पण खरे आहे की, दिल्लीपासून महाराष्ट्रातील भाजपाचे लोक हे सरकार पडणार आहे. आम्ही सरकार बनवणार आहोत. राष्ट्रपती राजवट लागू होणार अशी अफवा पसरवण्याचे काम केलं जात आहे. परंतु हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. महाविकास आघाडी सरकार एकजुटीने काम करत आहे. भाजपाने कितीही अफवा पसरवल्या तरी सरकार स्थिर राहणार आहे, असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.
देवेंद्र फडणवीसांचं महाविकास आघाडी सरकारवर टिकास्त्र
कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रावर केंद्र सरकार अन्याय करत आहे. केंद्र सरकारकडून राज्याला योग्य ती मदत केली जात नाही, असा खोटा प्रचार राज्य सरकारमधील नेते करत आहेत. अशारीतीने केंद्र सरकार विरोधात वातावरण तयार केलं जात आहे. वारंवार खोटी वक्तव्य केलं की ते लोकांना खरं वाटू लागतं. मात्र केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना वाटप केलं जातं. महाराष्ट्राला यात जास्तच मिळतं, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
केंद्र सरकारने आतापर्यंत 28 हजार 14 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला दिला आहेत. एप्रिल-मे महिन्याचा आगाऊ निधी केंद्र सरकारने दिला आहे. शेतीसाठी केंद्र सरकारने 9 हजार कोटी रुपये दिले आहेत. पीपीई किट आणि एन 95 मास्कचा पुरवठा केंद्र सरकारने केला. श्रमिक विशेष रेल्वेसाठी 300 रुपये दिले. मजुरांच्या छावण्यांसाठी 1611 कोटींची मदत केली. राज्याला 4 हजार 592 कोटींचं अन्नधान्य दिलं, अशी आकडेवारी देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जनतेसमोर मांडली.
Devendra Fadnavis | केंद्राकडून महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचा खोटा प्रचार, देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर घणाघात