रायगड : मोदीजी, आपल्याला जो खेळ करायचा आहे, तो खेळण्यातील नोटांशी करा. भारतीय अर्थव्यवस्थेशी नको, अशा आशयाचे पत्र लिहून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मोदींना खेळण्यातल्या नोटा पाठवल्या आहेत. 8 नोव्हेंबरला नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने जयंत पाटलांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे.

“नोटाबंदी लागू करताना या देशातील जनतेला आपण काळापैसा मुक्त भारत, दहशतवादाला संपूर्ण आळा आणि नंतर मग कॅशलेस अर्थव्यवस्था अशी असंख्य स्वप्न दाखवली होती. या जनतेने देखील आपण या देशाचे पंतप्रधान म्हणून आपल्यावर विश्वासही ठेवला होता.मात्र, या एक वर्षामध्ये नेमके यातून काय साध्य झाले व कोणत्या निकषांवर नोटाबंदीचे मोजमाप करावे?, असाच  प्रश्न आज सामान्य जनतेला पडलेला आहे.”, असेही जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

“नोटाबंदीतून आपण साध्य काय केले? भारताचा GDP 2.2 टक्के कमी झाला. अर्थात 2 लाख ४० हज़ाहजार कोटींहून अधिक रक्कम भारतीय अर्थव्यवस्थेतून बाहेर काढून अर्थव्यवस्था देशोधडीला लावली, शून्य टक्के काळा पैसा बाहेर आला, शेकडो स्टार्ट अप बंद पडले, शेतमालाचे भाव प्रचंड पडले त्यासोबतच लघुउद्योजक, असंघटित व्यापारक्षेत्र लयाला  नेले. पहिल्या 4 महिन्यातच 15 लाखांहून अधिक लोक बेरोजगार झाले, 150 निष्पाप लोकांनी रांगेत जीव गमावला.”, असे घणाघाती आरोपही जयंत पाटलांनी मोदींवर केले आहेत.