मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेबाबत केलेल्या वक्तव्यावर छगन भुजबळांनी स्पष्टीकरण दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्यात मला आनंद नव्हता, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.


दंगलीबाबत मनोहर जोशी यांनी श्रीकृष्ण आयोग नेमला होता. युतीच्या काळात फाईल तयार झाली होती. मी फक्त सही केली. त्यांना अटक करण्यात मला आनंद नव्हता. बाळासाहेबांना जेलमध्ये पाठवणार नव्हतो. जर ते शक्य झालं नाही तर त्यांना मातोश्रीवर ठेवणार होतो. परंतु त्यांना त्रास द्यायचा नव्हता. रमाबाईनगरमधील दंगलीत काही जणांच्या मृत्यूवरुन मी सरकार खुनी आहे, असा आरोप केला. त्यावेळी शिवसैनिकांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. परंतु कोर्टात कोणाला ओळखत नाही, असं सांगत प्रकरण मिटवलं.


परंतु 'सामना'मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी छापून आलं. मला क्लिन चीट मिळूनही हे छापून आल्याने बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. परंतु खटल्याचा निकाल जवळ आला असताना, बाळासाहेब यांची प्रकृतीच्या कारणाने तो मागे घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे तसेच बाळासाहेब ठाकरेंनी फोन करुन कुटुंबासोबत मातोश्रीवर येण्याचं निमंत्रण दिले. मी कुटुंबासह मातोश्रीवर गेलो आणि 3-4 तास गप्पा मारल्या, त्याचवेळी हा विषय संपला, असल्याचं छगन भुजबळांनी सांगितलं.



बाळासाहेबांना अटकेचा निर्णय एक व्यक्ती घेऊ शकत नाही : राज ठाकरे


बाळासाहेबांच्या अटकेचा निर्णय कुणा एकट्याचा असेल मला वाटत नाही. सरकारचा पाठिंबा असल्याशिवाय ही गोष्ट घडू शकत नाही. एखादा मंत्री उठेल आणि एवढा मोठा निर्णय घेईल असं होत नाही. मुळात छगन भुजबळांनी गिअर टाकला असेल मात्र एक्सिलेटर कुणीतरी दाबलं हा प्रश्न आहे. अशारीतीने एक माणूस बाळासाहेबांच्या अटकेचा निर्णय घेऊ शकत नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांचा दावा खोडून काढला. त्यानंतर बाळासाहेब असताना उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळ यांना मातोश्रीवर सहकुटुंब भोजनासाठी बोलावलं होतं. त्यामुळे आता भुजबळांनी माफी मागावी असा विषय येतच नाही. निवडणुकीतील मुद्दे भरकटवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात केला.



काय म्हणाले होते अजित पवार?


बाळासाहेबांना झालेली अटक अयोग्य होती. आमच्या मंत्रीमंडळातील काही वरीष्ठांच्या हट्टापायी ही अटक झाली होती. आम्ही त्यास विरोध केला होता. इतक्या टोकाचं राजकारण कोणी करू नये, असं आम्ही सांगितलं होतं. परंतु त्यावेळी आमच्या मताला एवढी किंमत नव्हती. त्यामुळे आम्ही तो निर्णय मागे घ्यायला लावू शकलो नाही.


अजित पवार म्हणाले की, बाळासाहेबांसोबत जे केलं, तसं कोणाच्याच बाबतीत करू नये. असं का करताय? असा सवाल आम्ही त्यावेळी संबंधित वरिष्ठांना विचारला होता. परंतु ते म्हणाले, आम्ही या विभागाचे प्रमुख आहोत, आम्हाला जे योग्य वाटतंय तो निर्णय घेणार आहोत. तुम्ही यात लक्ष घालू नका.




संबंधित बातम्या