Crime News : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने (NCB) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. मुंबई आणि नवी मुंबई परिसरात विविध ठिकाणी छापा टाकून पाच कोटी रुपयांच्या नशेच्या गोळ्या आणि औषधं जप्त केली आहेत. नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या 1 लाख 32 हजार अलप्राझोलम गोळ्या आणि CBCS बोटल्स जप्त करण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणी एनसीबीने एकाला अटक केली आहे.
मुंबई एनसीबीने मुंबईत अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्यीय अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा या कारवाईतून पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एनसीबीने 1,32,000 अल्प्राझोलम गोळ्या आणि 2,400 CBCS बाटल्या जप्त केल्या आहेत. ही कारवाई मुंबई आणि नवी मुंबईतीन विविध भागात करण्यात आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत नशेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीची माहिती एनसीबीला मिळाली. या माहितीच्या आधारे तपास करून एनसीबीने डोंबिवलीत राहणाऱ्या एस. यादव नावाच्या व्यक्तीला अटक केली. यादव मुंबई आणि आजूबाजूच्या भागात नशेच्या औषधांचा पुरवठा करत होता. अधिक चौकशी केल्यानंतर त्याने उत्तर प्रदेश आणि बिहारमधील टोळ्या या नशेच्या औषधांची तस्करी करत असल्याचे यादव याने सांगितले. त्यानंतर एनसीबीने मुंबई आणि नवी मुंबईतील काही ठिकाणी छापेमारी केली. यावेळी या छापेमारीत पाच कोटी रूपये किमतीच्या नशेच्या गोळ्या आढळून आल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात बेकायदेशीर औषधांची मुंबईत विक्री करण्यासाठी एक टोळी येणार होती. परंतु, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी वाढलेल्या सुरक्षेमुळे तस्करांनी त्यांचे वेळापत्रक काही दिवसांसाठी पुढे ढकलले. प्रजासत्ताक दिनानंतर कुरिअरमार्फत ही औषधे मुंबईत पोहोचली. याबाबत एनसीबीला माहिती मिळाल्यानंतर गुरूवारी एनसीबी अधिकारी कुरिअर कंपनीत पोहोचले.त्यावेळी एस. यादव माल घेण्यासाठी तेथे पोहोचला. यावेळी एनसीबीच्या अधिकार्यांनी त्याला अडवले आणि चौकशी केली. यावेळी यादव उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. परंतु, नंतर त्याने बेकायदेशीर औषधांचं पार्सल घेण्यासाठी आल्याचे कबुली दिली. यावेळी अधिकाऱ्यांनी पार्सल उघडून पाहिलं असता अल्प्राझोलमच्या 1,32,000 गोळ्या आढळल्या. त्यानंतर अधिकाऱ्यांनी यादवकडून माहिती घेऊन मानखुर्द येथे एक वाहन अडवले. यावेळी या वाहनातून देखील अवैध औषधे जप्त केली.
या कारवाईनंतर एनसीबीकडून मुंबईतील गोवंडी, ठाणे, धारावी इत्यादी ठिकाणच्या वितरण नेटवर्कवर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एससबीने आंतरराज्य पुरवठादार आणि स्थानिक ड्रग्ज विकणाऱ्यांची माहिती मिळवण्यासाठी अधिक तपास सुरू केला आहे.