भुयार खोदून बँकेवर दरोडा, चोरट्यांनी कितीचा मुद्देमाल लुटला?
एबीपी माझा वेब टीम | 15 Nov 2017 11:30 AM (IST)
बँकेच्या शेजारी असलेलं दुकान भाड्याने घेत चोरट्यांनी दरोड्याचा कट रचला होता. त्यांनी दुकानापासून बँकेपर्यंत 41 फूट भुयार खोदलं.
नवी मुंबई : नवी मुंबईतील बँक ऑफ बडोदाच्या दरोड्यात सुमारे 3 कोटींची चोरी झाल्याचं आता समोर आलं आहे. फिल्मी स्टाईलने भुयार खोदून बँकेत दरोडा टाकून दरोडेखोरांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लांबवली. जुईनगर सेक्टर 11 मधील बँक ऑफ बडोदाच्या शाखेतील 30 पैकी 28 लॉकर्स दरोडेखोरांनी फोडले. या जबरी दरोड्यात 2 कोटी 90 लाख रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाल्याचं सानपाडा पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी मंगळवारी बँकेच्या 30 खातेदारांचा जबाब नोंदवला. शेजारच्या दुकानापासून बँकेपर्यंत भुयार बँकेच्या शेजारी असलेलं दुकान भाड्याने घेत चोरट्यांनी दरोड्याचा कट रचला होता. त्यांनी दुकानापासून बँकेपर्यंत 41 फूट भुयार खोदलं. त्यामधून बँकेत घुसून गॅस कटरच्या साहाय्याने 28 लॉकर्सवर हात साफ केला. मोठं भुयार खोदून बँक लुटली, नवी मुंबईत जबरी दरोडा पॅन कार्ड, रहिवासी दाखला बनावट "दरोडेखोरांनी बालाजी जनरल स्टोअर भाड्याने घेताना रिअल इस्टेट एजंटला बनावट पॅन कार्ड दिलं. भाडेकरुंनी पॅन कार्ड तर दिलं पण रहिवासी दाखल्याचं कागदपत्र दिलं नाही. करारावर सांताक्रूझच्या राजीव नगर झोपडपट्टीचा पत्ता होता. पोलिसांनी तिथे जाऊन चौकशी केली असता तो पत्ता बनावट असल्याचं समजलं. त्यानंतर पॅन कार्डची पडताळणी केली असता, तेही बनावट असल्याचं समोर आलं," असं सानपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज पडवी यांनी सांगितलं. किती मुद्देमाल चोरीला? पोलिसांच्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी 10.58 किलो सोनं, 6.39 किलो चांदी, 70 हजार रुपये रोख आणि 50 हजार रुपये किंमतीची एक हिऱ्याची अंगठी लांबवली. तसंच 80 लॉकरमधील किंमती वस्तू ग्राहकांना परत केल्याचं बँकेतर्फे सांगण्यात आलं आहे. तर ज्यांचं लॉकर फोडलं आहे, अशा दोन ग्राहकांनी अजून संपर्क साधला नाही, असं पोलिसांनी सांगितलं. नेमकी घटना काय? एक ग्राहक सोमवारी जेव्हा आपलं लॉकर उघडण्यासाठी लॉकर रुममध्ये गेला, त्यावेळी आजूबाजूचे 27 लॉकर्स तोडल्याचं दिसून आलं. जेव्हा ग्राहक लॉकर रुममध्ये आला, तेव्हा त्याच्यासोबत बँक कर्मचारीही उपस्थित होता. तेव्हा दोघांनीही जे चित्र पाहिलं ते धक्कादायक होतं. लॉकर रुममध्ये एक भुयार होतं, ते शेजारच्या दुकानापर्यंत खणलं होतं. चोरट्यांनी या भुयारातून प्रवेश करुन, लॉकर फोडून लुटमार केली. चोरट्यांनी लॉकरमधील दागिन्यांवरच डल्ला मारल्याचं पोलिसांनी सांगितलं.