नवी मुंबई :  नवी मुंबईकरांचे समुद्रमार्गाने जलवाहतुकीने मुंबईत किंवा अलिबागला प्रवास करायचे स्वप्न येत्या सहा महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. नेरूळ खाडीतील जेट्टीचे काम अंतिम टप्यात आले असून येत्या मार्च महिन्यात नेरूळ- गेट वे ऑफ इंडिया - मांडवा अशी जलवाहतूक सुरू होणार आहे. ही जलवाहतूक सुरू होणार असल्याने दोन तासाचे अंतर आवघ्या आर्धा तासावर येणार आहे.


नेरूळ खाडीमध्ये उभे राहत असलेल्या जेट्टीचे काम 2018 मध्ये सुरू करण्यात आले होते. मुंबई आणि मांडवाला जोडणाऱ्या जलमार्गाचा नवी मुंबईतील थांबा नेरूळ खाडीमध्ये उभा राहत आहे. 111 कोटी खर्च करून उभा राहत असलेल्या नेरूळ जेट्टीचे काम पर्यावरण परवानग्यांमुळे आणि कोरोनामुळे रखडले होते. या प्रकल्पाच्या पाहणीसाठी खासदार राजन विचारे आणि सिडको एम डी संजय मुखर्जी आले होते. त्यांनी भेट देत आढावा घेतला. नवी मुंबईतून मुंबई, अलिबागला जाण्यासाठी लोकल किंवा रस्तेमार्गाने जाण्यासाठी सध्या दीड - दोन तासाचा अवधी लागतो. मात्र या मार्गाने जलवाहतूक सुरु झाल्यानंतर नागरिकांसाठी हा प्रवास सोपा होणार आहे. आता येत्या मार्च मध्ये जेट्टीचे काम पूर्ण होऊन जलवाहतूक सुरू होणार असल्याने अवघ्या आर्धा तासात गेट वे ऑफ इंडिया आणि मांडवा येथे पोहोचता येणार आहे.



वनविभागाच्या परवानगीसाठी 18 महिन्याचा कालावधी लागला असला तरी आता सर्व परवानग्या पूर्ण झाल्या असल्याचे सिडको एम डी संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे. मार्चपर्यंत काम पूर्णत्वास नेवून सदरची जेट्टी मेरिटाईम बोर्डाला हॅन्ड ओव्हर करणार असल्याचे संजय मुखर्जी यांनी सांगितले.