नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या देण्यात आलेल्या कामांमध्ये सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. एका विशिष्ट कंपनीला हा ठेका देण्यासाठी नियमाला फाटा देवून  निर्णय घेण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. या बाबतच्या चौकशीच्या मागणीचं पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आले असून विमानतळाच्या या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करत कोर्टात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.


पनवेल येथे काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या सभेत काँग्रेस नेत्यांनी भाजपावर जोरदार आरोप केले. सरकार कितीही म्हणत असलं तरी प्रत्यक्षात चारा छावण्या कुठेही सुरू झाल्या नाहीत. राज्यात दुष्काळाच्या घोषणा झाल्या पण अंमलबजावणी होत नाही. राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना कामाची मोकळीक दिली जात नसल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आघाडीसंदर्भात बोलणी थांबली नसल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले

सूज्ञ जनता दडपशाही सहन करणार नाही
केंद्रातले आणि राज्यातले भाजप शिवसेना सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून जनतेमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप आहे. काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेला जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे सरकार इतकं घाबरले आहे की जनसंघर्ष यात्रेतील प्रत्येक सभा, नेत्यांची भाषणे रेकार्ड करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, असे खा. चव्हाण पेण येथील सभेत म्हणाले. सभेत पोलीस सर्व नेत्यांचे भाषण रेकार्ड करत होता.


काँग्रेस कार्यकर्त्यांनी या पोलिसाकडे विचारणा केली असता आपण वरिष्ठांच्या आदेशानुसार रेकॉर्डींग करत असल्याचे त्याने सांगितले. पराभव समोर दिसू लागल्यानेच सरकार आता विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत आहे. साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांचे भाषण सरकारचा जातीयवादी, हुकुमशाही चेहरा उघडा पाडणारे होते म्हणून सरकारने आयोजकांवर दबाव आणून त्यांचे निमंत्रण रद्द करायला लावले. मंत्री विद्यार्थ्यांना धमक्या देत आहेत. राज्यातील सूज्ञ जनता ही दडपशाही सहन करणार नसून, येत्या निवडणुकीत भाजपला जागा दाखवली जाईल, असे खा. चव्हाण म्हणाले.