मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते, खासदार नारायण राणे यांची तोफ मुंबईत धडकणार आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री'वरील भेटीनंतर राणे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

उद्या (7 जून) संध्याकाळी सहा वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात नारायण राणे संवाद साधणार आहेत.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर राणेंनी कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकण असे दौरे केले होते. त्यानंतर मुंबईत पहिल्यांदाच कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची ताकद या मेळाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येईल.



मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षकपदाची निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकांसोबत  2019 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात राणे या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

मुंबईत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची ताकद वाढवण्यासाठी नारायण राणे यांचा हा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे.