मुंबई : "शिवसेना-भाजप युती होणारच याचं भाकित मी सुरुवातीपासूनच करत होता. लाथाडत असले तरी एकत्र येणार हे माहित होतं. युती झाली मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत नव्हता. जनतेसाठी नाही तर मातोश्रीच्या स्वार्थासाठी युती झाली आहे. तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना, यासाठी ही युती आहे," अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख आणि खासदार नारायण राणे यांनी केलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते.


राणे म्हणाले की, "शिवसेना-भाजपने एका बाजूला सत्ता उपभोगली तर दुसरीकडे एकमेकांवर टीका केली. मातोश्रीचा स्वार्थ आणि बचावासाठी ही युती केली आहे. युतीचा फायदा दोन्ही पक्षांना होणार नाही. युती झाली खरी पण मनं जुळली नाहीत. शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते लढायला समोर ठाकले आहेत. साडेचार वर्षे जी टीका झाली, त्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते नाराज आहेत. युती झाल्याचं कुठेही समाधान नाही. तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना, यासाठी ही युती आहे."

संजय राऊतांनी स्वत:ची फजिती केली
"बोलेल तसा वागेल असा शिवसेना पक्ष नाही. संजय राऊत यांनी भाजपविरोधी प्रचंड लिखाण केलं होतं. संजय राऊत यांनी स्वत:ची फजिती करुन घेतली आहे. आता शिवसेनेकडे नीतीमत्ता नाही, बाळासाहेब असताना ती होती. आता सडवणार नाही, असं भाजपने सांगितलं असावं, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुंबई महापालिकेत सर्वाधिक भ्रष्टाचार
मुंबई महापालिकेविषयी बोलताना नाराराणे राणेंनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. देशात सर्वाधिक भ्रष्टाचार मुंबई महापालिकेत झाला आहे. भ्रष्टाचाराने जमवलेले पैसे पचवायचे कसे यासाठी ही युती करण्यात आली आहे. स्वबळावर लढण्याचा ठराव झाला, भाजपाच्या 25 मतदारसंघात लढायची तयारी शिवसेनेने केली होती. आता तिथे ते भाजपाला कसे मतदान करतील असा प्रश्न विचारात भाजपाबाबतही असंच असल्याचं नारायण राणेंनी सांगितलं.

भाजपवर टीका करणार नाही
"आगामी निवडणुकीत मी भाजपवर प्रहार करणार नाही. काही गोष्टींचा संयम मी पाळणार आहे. त्यांनी मला खासदार बनवलं आहे," असं राणेंनी सांगितलं. तसंच यंदा शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत 25 जागाही मिळणार नाहीत तर लोकसभेत 10 जागांपर्यंतही शिवसेना पोहोचणा नाही, असं भाकित त्यांनी वर्तवलं

राजीनामा देण्याचा काय संबंध?
"मी भाजपचा सदस्य नाही, त्यामुळे राजीनामा देण्याचा संबंधच येत नाही. राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देणार नाही. भाजपने मला जाहीरनामा समितीवर घेतलं आहे. पण आता माझा पक्ष वेगळी निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे मी दोन पक्षाचे जाहीरनामे तयार करु शकत नाही. मला जाहीरनामा समितीतून वगळावं, याबाबत मी भाजपला लेखी कळवणार आहे," असंही नारायण राणे म्हणाले.

महाआघाडीत जाण्याचा विचार नाही
आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात काही जागा लढवणार असल्याचं राणेंनी सांगितलं. तसंच विधानसभेच्या जागाही लढवणार असल्याचं ते म्हणाले. मात्र मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही आणि विधानसभा लढवायची की नाही याचा निर्णय लोकसभेनंतर घेणार आहे. तसंच महाआघाडीत जाण्याचा विचार नाही, मात्र आघाडीने पाठिंबा दिला तर मी तो घेणार, असंही राणेंनी स्पष्ट केलं.

पाहा व्हिडीओ