मुंबई : मराठा समाजाचे मोर्चे शिस्तबद्धपणे निघत आहेत. त्यांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. हे सारं पाहूनच राज्य सरकार आणि मुख्यमंत्री बिथरले आहेत, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केले आहे. त्याचसोबत, दलित विरुद्ध मराठा भांडण लावून, दंगल घडवण्याचं कटकारस्थान सुरु असल्याचं त्यांच्या कृतीतून जाणवत असल्याचंही राणे म्हणाले.

"रामदास आठवले केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत. राजकुमार बडोलेंनी बेजबाबदार वक्तव्य केलं आहे. बडोलेंच्या त्या वक्तव्याचं आठवलेंनी समर्थन करायला नको होतं. मुख्यमंत्र्यांचा त्यांच्या मंत्र्यांवरच अंकुश नाही. जर अंकुश असता, तर त्यांना मंत्रिमंडळातून हाकलून दिलं असतं. पण हे मुख्यमंत्री असं काही करत नाहीत.", अशी टीकाही नारायण राणेंनी मुख्यंमत्र्यांवर केली.

"ईबीसीची मर्यादा 6 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. खरंतर मर्याद वाढवण्याचं कारण म्हणजे मराठ्यांना आरक्षण देता येऊ नये, हे आहे. किंबहुना, म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी केलेली ही खेळी आहे.", असा आरोप राणेंनी केला आहे.

"डाळ नियंत्रण कायद्याचा प्रस्ताव फेटाळण्यात येणार आहेत, हे राज्य सरकारला माहिती होतं. जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा प्रस्ताव पाठवला. त्यामुळे ऐन दिवाळीत जनतेला डाळ विकत घेणं असह्य होणार आहे.", असेही राणे यावेळी म्हणाले.