मुंबई : शिक्षिकेने कानशिलात लगावल्यामुळे आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या कानाचा पडदा फाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नालासोपाऱ्यातील शाळेत हा प्रकार घडला असून अटक झालेल्या शिक्षिकेची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
इतिहासाचा तास घेण्यासाठी संबंधित शिक्षिका शुक्रवार 2 फेब्रुवारी रोजी वर्गात आली. इतिहासाचं पुस्तक न आणल्यामुळे त्यांनी पाच-सहा विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढलं. वर्ग सुरु असताना शिक्षा झालेले विद्यार्थी मस्ती करत असल्याचं शिक्षिकेला दिसलं. त्यामुळे त्या वर्गाबाहेर गेल्या.
शिक्षिकेने गोंगाट करणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांच्या तळव्यावर मारलं, तर उजव्या हाताने संबंधित विद्यार्थ्यांच्या डाव्या कानशिलात लगावली. विद्यार्थ्याच्या कानात जोरदार कळ आली आणि रक्ताचे थेंबही आले, असा दावा त्याच्या आईने पोलिस तक्रारीत केला आहे.
त्यानंतरही शिक्षिका वर्गात परतली.
दुपारी 12.30 वाजता शाळा सुटल्यावर विद्यार्थी घरी परतला आणि त्याने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी त्याला भाईंदरमधील ईएनटी (कान-नाक-घसा) तज्ज्ञाकडे नेलं. विद्यार्थ्याच्या डाव्या कानाचा पडदा फाटल्याचं डॉक्टरांनी सांगितलं असून त्याला औषध दिलं.
आपल्या मुलाला प्रचंड वेदना होत असून त्याने शाळेत जाण्यास नकार दिल्याचं विद्यार्थ्याच्या आईने सांगितलं. अखेर त्यांनी 5 तारखेला पोलिसात धाव घेतली. शिक्षिकेवर गुन्हा नोंदवण्यात आला असून वसई सेशन्स कोर्टाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे.
शिक्षिकेची चपराक, विद्यार्थ्याच्या कानाचा पडदा फाटला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Feb 2018 08:42 AM (IST)
इतिहासाचं पुस्तक न आणल्याने शिक्षिकेने काही विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढलं. तरीही विद्यार्थी गोंगाट करत असल्यामुळे एकाला तिने कानशिलात लगावली
प्रातिनिधीक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -