Gateway Of India Mumbai : मुंबई म्हंटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर जी दृष्य येतात ती म्हणजे अथांग अरबी समुद्राच्या काठावर असलेल्या गेट वे ऑफ इंडियाची. मुंबई शहराचा मानबिंदु म्हणून गेट वे ऑफ इंडियाकडे बघितलं जातं. 113 वर्षांपासून समुद्राच्या लाटा आणि वादळांचा सामना करत ही वास्तू आजही दिमाखात उभी आहे.   मात्र, याच गेट वे ऑफ इंडियाला तडे गेल्याचं समोर आलं आहे. पाहूयात काय आहे हे संपूर्ण प्रकरण?  


113 वर्ष जुन्या गेट वे ऑफ इंडिया या वास्तूला तडे गेल्याचं समोर आले आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये तडे पडल्याचं निष्पन्न झाले आहे. 'गेट वे'च्या जिर्णोधाराचा प्रस्ताव सरकार मान्य करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेट वे ऑफ इंडिया ही वास्तू फक्त मुंबईचीच नाही. तर अवघ्या देशाची ओळख. 1911 साली इंग्रजांनी या वास्तूची निर्मिती केली. आणि 1924 साली सर्वसामान्यांसाठी खुली केली. पण, 100 वर्षांपेक्षा जास्त जुन्या वास्तूला तडा गेलाय...मुंबई जवळून जाणाऱ्या प्रत्येक चक्रीवादळावेळी गेट वेनं उंच उंच लाटा झेलल्या.. पण, यावेळच्या वादळानंतर..एक अत्यंत महत्वाची गोष्ट निदर्शनास आली. ती म्हणजे गेल्या वर्षीच्या चक्रीवादळात वास्तूचं नुकसान झाल्याचं दिसलं. याप्रकरणी मागील आठवड्यात सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे. 


 गेट वे ऑफ इंडियाच्या इमारतीला खरंच, तडे गेलेत का?


1911 सालची ही वास्तू 1924 मध्ये लोकांकरीता खुली करण्यात आली होती. नुकतंच गेट वे ऑफ इंडियाचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं. त्याच ऑडिटनुसार इमारतीवर दर्शनी भागात भेगा गेल्याचं दिसलं. वास्तूवर अनेक ठिकाणी वनस्पतींही वाढल्याचं दिसलं. दुसरीकडे, डोममधील वॉटरप्रूफिंग आणि सिमेंट काँक्रीटचे देखील नुकसान झालं आहे.  


त्यानंतरच राज्याच्या पुरातत्व आणि वास्तुसंग्रहालय संचालनालयानं 6.9  कोटींचा जीर्णोध्दारासाठीचा प्रस्ताव सरकारकडे सादर केलाय. जो अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. गेट वे ऑफ इंडिया वास्तूशिल्पाचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखला जातो. इंग्लंडचा राजा पाचवा जाॅर्ज यांच्या भेटीस्मरणार्थ हे प्रवेशद्वार उभारलं गेलं होतं. स्वातंत्र्यानंतर ब्रिटीश साम्राज्याच्या शेवटच्या सैनिकांनी भारत सोडला तेव्हा ते या संरचनेतून गेलेहोते. ज्यानंतर भारतातील ब्रिटीश साम्राज्याचे वर्चस्व संपुष्टात आलं होतं.  भारताचं प्रवेशद्वारे समजल्या जाणाऱ्या ह्या शहरानं ही वास्तू जपली आहे.  अनेक चित्रपटातून ही वास्तू लोकांच्या घराघरातआणि मनात देखील पोहोचली. मात्र, सध्याला ही वास्तू धोकादायक स्थितीत असल्याचा अहवाल समोर आलाय. त्यामुळे सरकारआता याप्रकरणी काय पाऊलं उचलतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.