मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात गेले काही दिवस अधिक प्रमाणात पाऊस (Rain) होत आहे. यादरम्यान ज्या व्यक्ती संथगतीने निचरा होत असलेल्या पाण्यातून चालल्या आहेत, अशा व्यक्तींना लेप्टोचा (Leptospirosis) संसर्ग होण्याची शक्यता असते. तर ज्या व्यक्तींच्या शरीरावरील जखम किंवा खरचटलेल्या भागाचा साचलेल्या पाण्याशी किंवा चिखलाशी संपर्क आला असेल, त्या व्यक्तींना लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनानुसार सार्वजनिक आरोग्य खात्याला जनजागृतीसह आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर पावसाळी आजारांच्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त यांनी  मार्गदर्शनात आयोजित एका विशेष आढावा बैठकीदरम्यान पावसाळी आजारांच्या अनुषंगाने आवश्यक ती जाणीव जागृती करण्यासह वैद्यकीय उपचार क्रमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्ताने सर्व संबंधितांना दिले आहेत.

Continues below advertisement

लेप्टोस्पायरिसिस बाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य विभागाद्वारे कळविण्यात आले आहे की, पावसाच्या पाण्यातून किंवा चिखलातून चाललेल्या व्यक्तींनी 24 ते 72 तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहिती देताना सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे असेही कळविण्यात आले आहे की, अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते. याच पाण्यात 'लेप्टोस्पायरोसिस' या रोगाचे 'लेप्टोस्पायरा' (स्पायराकिट्स) हे सूक्ष्म जंतू असू शकतात. अशा बाधीत पाण्याशी माणसाचा संपर्क आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते. तसेच व्यक्तीच्या पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जखम असेल, अथवा साधे खरचटलेले जरी असेल; तरी अशा छोट्याशा जखमेतून सुद्धा लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत, असेही आवाहनही त्यांनी केले आहे. 'लेप्टोस्पायरोसिस' हा एक गंभीर आजार असून वेळीच औषधोपचार न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे याबाबत वेळीच प्रतिबंधात्मक औषध उपचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने किंवा आरोग्य केंद्रे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे दवाखाने व रुग्णालये येथे संपर्क साधावा. या ठिकाणी वैद्यकीय तपासणी-मार्गदर्शन व आवश्यक ते औषधोपचार मोफत उपलब्ध आहेत. तसेच आपल्या कुटुंबातील व्यक्तींना व मित्रमंडळींना देखील याबाबत माहिती द्यावी.

त्याचबरोबर पावसाळ्यात कोणताही ताप हा डेंग्यू, मलेरिया अथवा 'लेप्टोस्पायरोसिस' असू शकतो. त्यामुळे कोणत्याही तापाकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. प्रतिबंधासाठी पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे किंवा गमबुटाचा वापर करावा. साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुवून कोरडे करावेत.

Continues below advertisement

हेही वाचा

जिल्हा परिषदेच्या 1183 महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; कारवाई होणार, सीईओंचे आदेश