Mumbai Worli Political Updates : आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) वरळी (Worli Constituency) मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  यांना वरळीमध्ये मोठा धक्का बसला आहे. वरळीमधील शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ऐन दसरा मेळाव्याच्या तोडांवर शेकडो शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. कोस्टल रोडसंदर्भात अदित्य ठाकरेंनी लक्ष न दिल्यानं शिंदे गटात सामील होत असल्याची प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांसाठी खास धनुष्यबाणाचा पुष्पगुच्छ कार्यकर्त्यांनी आणला होता. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं. पण त्यावेळी त्यांचा पुरता गोंधळ उडाला होता. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बोलताना म्हणाले की, "तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं इथं आलात, मी तुमचं स्वागत करतो. आपण सर्व विषय सोडवुयात. आपण सगळे प्रश्न सोडवणार आहोत. शिक्षकांचे जे काही प्रश्न आहेत ते आपण सोडवणार आहोत. शिक्षक भारताचं भविष्य, तरुण पिढी घडवण्याचं काम करत असतो. आई-वडिलांच्या नंतर गुरुजनांचं स्थान असतं. त्यामुळे दिवाळीनिमित्तानं आम्ही त्यांच्यासाठी निर्णय घेतला आहे." तसेच पुढे बोलताना सातव्या वेतन आयोगासह शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवणार असल्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंना दिलं आहे. 


पाहा व्हिडीओ : मी सीएम म्हणून स्वतःला कॉमन मॅन समजतो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 



शिक्षक आणि शाळांच्या संख्येत मुख्यमंत्र्यांचा गोंधळ 


शिक्षकांना आश्वासन देताना मात्र मुख्यमंत्री चांगलेच गोंधळल्याचं पाहायला मिळालं. सातव्या वेतन आयोगासह सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन देत असताना मुख्यमंत्री शिंदे यांची शाळा आणि शिक्षकांच्या संख्येत गफलत झाली. 104 शाळांऐवजी, 104 शिक्षकांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. तेवढ्यात मंचाखाली उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी शिक्षक नाही, तर 104 शाळा असल्याची आठवण मुख्यमंत्र्यांना करुन दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्यांना विचारुन आपली चूक सुधारली आणि उपस्थितांशी संवाद पुढे सुरु ठेवला. त्यानंतर आता मी सविस्तर बोलत नाही, तर आपण एक बैठक घेऊ आणि त्यानंतर सर्व काही ठरवू असं मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना सांगितलं. 


पुढे बोलताना मुख्यमंत्री उपस्थितांना म्हणाले की, "हे सरकार तुमचं सर्वांचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे. तुम्हाला सर्वांनाही हे सरकार आपलं वाटतंय, त्यामुळे तुम्ही हक्कानं तुमच्या मागण्या मांडत असता. तुमचे सर्व प्रश्न आपण सोडवू. न होणारी कामं आपण पूर्ण करु. तुमचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही. असा आपला प्रयत्न असणार आहे. आता मुख्यमंत्री म्हणजे, मी स्वतः सर्वसामान्य माणूस समजतो. हे सरकार तुमच्यासाठीच आहे. तुमचे प्रश्न ते आमचे प्रश्न, तुमच्या समस्या त्या आमच्या समस्या."