Mumbai Water Cut :  मुंबई महानगरपालिकेच्या (BMC)  भांडुप पश्चिम परिसरात असणाऱ्या 1800  मीमी व्यासाच्या जलवाहिनीला उद्भवलेली गळती दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.   या  तातडीच्या दुरुस्ती कामामुळे भांडुप पश्चिम परिसरातील काही भागांमध्ये आज गुरुवारचा पाणी पुरवठा होणार नाही. पाणी जपून काळजीपूर्वक वापरण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन केले आहे.  


भांडुप पश्चिमेकडील श्रीराम पाडा परिसरातील सॅडल बोगद्याजवळ 1800 मी. मी. व्यासाच्या तानसा जलवाहिनीमध्ये गळती झाल्याने महानगरपालिकेमार्फत तातडीचे दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे‌. हे दुरुस्ती काम योग्य प्रकारे व्हावे, यासाठी जलवाहिनी वरील पाण्याचा दाब कमी करणे गरजेचे असून याकरता भांडुप कॅबिन येथील तानसा पश्चिम जलवाहिनीवरील झडप बंद करणे आवश्यक आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी अंदाजे 12 तासाचा कालावधी लागणार आहे.  त्यामुळे  भांडुप पश्चिम परिसरातील काही ठिकाणचा गुरुवारचा  दि पाणीपुरवठा बाधित होणार आहे. तरी या परिसरातील नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात येत आहे.


कोणत्या भागातील पाणीपुरवठा होणार बाधीत?


बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे 'एस' विभागातील भांडुप पश्चिमेकडील डोंगराळ  भागात पाणी पुरवठा बाधित होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने श्रीरामपाडा, तुळशेतपाडा, वाघोबावाडी, रामनगर, तानाजीवाडी , रावते कंपाऊंड, त्रिमूर्ती नगर, शिवाजी नगर, नरदास नगर, टेंभीपाडा, साई हिल, साई विहार, सोनापूर येथील काही भाग, खिंडीपाडा, गांव देवी रोड, गाव देवी टेकडी, मरोडा हिल, पाटकर कंपाऊंड, गणेश नगर, सर्वोदय नगर तसेच भांडुप जलाशय येथून होणारा पाणी पुरवठा, रमाबाई नगर पंपिंग,  महात्मा फुले नगर पंपिंग सप्लाय व डांबर कंपनी या ठिकाणांचा समावेश आहे. तरी जलवाहिनी दुरूस्तीचे काम पूर्ण होइपर्यंत या परिसरांमधील पाणीपुरवठा बंद राहील. तरी कृपया संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरून बृहन्मुंबई महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन जलभियंता खात्याद्वारे करण्यात आले आहे.


पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन


तसेच काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी राहील. या पाणीकपाती दरम्यान जलाशयातील पातळी लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास विभागवार पाण्याच्या वेळेत बदल करण्यात येईल, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. या कालावधीत पाण्‍याचा जपून वापर करावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.