मुंबई : 6 एप्रिलला रामनवमी झाली, पण त्यादिवशी मिरवणुकीला परवानगी नाकारण्यात आली. म्हणूनच रविवारी विश्व हिंदू परिषदेतर्फे वडाळ्यात मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण त्यापूर्वीच विहिंपचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये राडा झाला. यावेळी रॅलीसाठी आग्रही असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा पठण केलं. वडाळ्यात नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून.

मुंबईतल्या वडाळ्यात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाककडून रामनवमीला म्हणजे 6 एप्रिलला मिरवणूक काढण्यात येणार होती. परंतु त्या दिवशी पोलिसांनी परवानगी नाकारली. म्हणून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलनं रविवारी 20 एप्रिलला मिरवणूक काढायचं ठरवलं. 

मिरवणुकीला पोलिसांची परवानगी नाही

सुरूवातीला त्यासाठी पोलिस पातळीवर परवानगी मिळत नव्हती. रविवारी दुपारी मोठा जमाव जमला. मिरवणूक निघणारच होती, तोच राडा झाला. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. तर पोलिसांकडून कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

कार्यकर्ते आक्रमक, मिरवणुकीवर ठाम

पोलिसांनी मिरवणुकीला विरोध केल्यानंतर कार्यकर्त्यांकडून हनुमान चालीसा  पठण केलं गेलं. यावेळी कार्यकर्ते पोलिसांच्या विरोधात कमालीचे आक्रमक झाल्याचं दिसून आलं. यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना स्टेशनला नेण्यात आलं. यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा वडाळ्यात पोलिस स्टेशनला पोहोचले आणि त्यांनी घडलेल्या या संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली. दुसरीकडे पोलिस, हिंदुत्ववादी संघटनांचा संवाद सुरु होता. 

बराच काळ सुरू असलेल्या चर्चेनंतर अखेर पोलिसांनी या मिरवणुकीला परवानगी दिल्याचं जाहीर करण्यात आलं. वडाळ्यात पोलीस, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलामध्ये सुरु असलेलं परवानगी की विनापरवानगी, दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोपांच्या रामायणाचा अध्याय संपला आणि मिरवणूक मार्गस्थ झाली.

 

ही बातमी वाचा :