Mumbai Virar Accident News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पायी परिक्रमा करत असलेल्या एका जैन मुनींचा भीषण अपघातात मृत्यूझाल्याची घटना घडली आहे. जैन मुनींचा जागीच मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना विरारजवळील मांडवी पोलीस ठाणे हद्दीतील भालीवली परिसरात गुरुवारी पहाटे सुमारे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, अपघातात जैन मुनींचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी मांडवी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.
पाठीमागून वेगाने येणाऱ्या कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं दिली धडक
नम्ररत्न विजय महाराज (वय 21) असे अपघातात मृत्यू झालेल्या जैन मुनींचे नाव असून ते मूळचे गुजरात येथील रहिवासी होते. ते पालघर जिल्ह्यातील ढेकाळे परिसरातील सातीवली प्रतापधाम येथून विरारच्या शिरसाड फाटा दिशेने पायी परिक्रमा करत जात होते. दरम्यान, भालीवली येथे मुंबई-गुजरात लेनवर एक ट्रक बंद पडलेला होता. त्याचवेळी पाठीमागून वेगाने येणाऱ्या कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कारने प्रथम बंद पडलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर रस्त्याने चालत असलेल्या जैन मुनींना धडक दिली. या भीषण अपघातात नम्ररत्न विजय महाराज यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक आणि कार चालक या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास मांडवी पोलीस करत आहेत.