Mumbai University Senate elections: सध्या निवडणुकांचा धुराळा उडण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) सिनेट निवडणुकीपासून (Senate Election) पहिली सुरुवात होणार आहे. नुकताच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे.  मागील अनेक महिन्यांपासून राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटना या निवडणुकांची आतुरतेने वाट पाहत होते. पण आता या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून सप्टेंबर महिन्यात या निवडणुका होणार आहेत. दरम्यान या निवडणुकांमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) विरुद्ध अमित ठाकरे (Amit Thackeray) अशी लढत होणार आहे. तर या निवडणुकांसाठी मनसे, शिंदे गट आणि भाजप एकत्र येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


दोघाचं लक्ष्य एकच…मुंबई विद्यापीठ


सिनेटच्या निवडणुकीवर ज्यांची सत्ता त्यांच्यासोबत मुंबईतली युवाशक्ती असं जवळपास समीकरण तयार झालं असल्याचं म्हटलं जातं. आतापर्यंत मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद पाहायला मिळाली आहे . पण आता या निवडणुकांसाठी मनसे, शिंदे गट आणि भाजप हे तिघे एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. या सगळ्यामध्ये आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने देखील भर पडली आहे. त्यामुळे ही निवडणूक आदित्य ठाकरेंसाठी तितकी सोपी नसणार असल्याचं म्हटलं जात आहे. आता या  सिनेट निवडणुकीसाठी हे तिनही पक्ष मोठ्या ताकदीनं मैदानात उतरणार असून  त्यासाठी पडद्यामागे मोर्चेबांधणी केली जात असल्याचं म्हटलं जात आहे. 


जेव्हापासून  आदित्य ठाकरे राजकारणात उतरले आहेत तेव्हापासून त्यांचं मुंबई विद्यापिठावर वर्चस्व राहिलं असल्याचं सांगितलं जातं. मागील वर्षी झालेल्या सिनेट निवडणुकीमध्ये 10 पैकी  10 जागा आदित्य ठाकरे यांनी जिंकल्या होत्या. त्यामुळे युवा नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरेंकडे पाहिलं जातं. म्हणूनच  या नेतृत्वाला पाडण्यासाठी राज्यात ज्या आघाडीची चर्चा आहे ती या सिनेटच्या निवडणुक पाहायला मिळू शकते असं म्हटलं जात आहे. 


तर दुसरीकडे अमित ठाकरे यांना राजकारणात छाप पाडण्यासाठी मुंबईत विद्यापीठाची निवडणूक अत्यंत गरजेचं असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे अमित ठाकरे हे शिंदे आणि भाजपच्या साथीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत. अमित ठाकरेंकडे  मनसेच्या विद्यार्थी  सेनेचं अध्यक्षपद आहे. तसेच ते पक्षाचे नेते देखील आहेत. त्यामुळे त्यांना आगामी काळात राजकारणात पाय रोवून उभं  राहायचं असेल तर सिनेट निवडणुकीत आपली ताकद दाखवणं गरजेचं असणार आहे. 


कसा असणार निवडणुकीचा कार्यक्रम


मुंबई विद्यापीठांच्या एकूण दहा जागांसाठी ही सिनेट निवडणूक घेतली जाणार आहे. ही निवडणूक 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. सिनेट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहेत. तर उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया 21 ऑगस्ट सकाळी 11 वाजेपर्यंत होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ही 25 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. तर 28 ऑगस्ट रोजी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. 10 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सिनेट निवडणुकीसाठी मतदान करण्यात येणार असून 13 सप्टेंबर रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ही पहिलीच सिनेट निवडणूक होणार आहे. त्यामुळे ही रंगतदार होणार यामध्ये शंका नाही. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या या परीक्षेमध्ये कोण पास आणि नापास होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हेही वाचा : 


Mumbai University Senate Elections: सिनेट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; मुंबई विद्यापीठात गुलाल उधळणार