Mumbai Trans Harbour Link: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज मुंबई ट्रान्सहार्बर लिंक रोडची पाहणी केली. या प्रकल्पाची एक बाजू पूर्ण झाली आहे. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रवासही केला. मुंबई आणि नवी मुंबईला रायगड जिल्ह्याला जोडणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळं सायन-पनवेल मार्गावरचा बराचसा भार कमी होणार आहे. तसंच प्रवाशांना मुंबई शहरातून एक तासाच्या आत न्हावा-शेवा आणि पनवेलला पोहोचणं शक्य होणार आहे. या प्रकल्पामुळं प्रदूषणही कमी होणार आहे.


एमएमआरडीएने 9 मे या तारखेला पारबंदर प्रकल्पातील शेवटच्या 70 वा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकचे (पोलादी कमान) काम पूर्ण करून एक महत्त्वाचा टप्पा पार केला होता. त्यानंतर आता संपूर्ण सी-लिंकच काम पूर्ण झाले आहे. आज अखेरच्या जोडणीचे काम करण्यात आले. त्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष उपस्थित होते. 


मुंबई शिवडी ते रायगड न्हावा पारबंदर समुद्रावरील पूलाची वैशिष्टे


1) प्रकल्पामध्ये मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे 22 किमी लांबीच्या सहा पदरी (3+3 मार्गिका दोन आपात्कालीन मार्गिका) पुलाचा अंतर्भाव आहे. 


2) या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे 16.5 किमी असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे 5.5 किमी इतकी आहे. 


3) या पुलाला मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील ( mainland) शिवाजी नगर व राष्ट्रीय महामार्गवरील चिर्ले गावाजवळ आंतरबदल (Interchanges) आहेत. प्रकल्प नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. 







सागरी सेतू प्रकल्पामुळे काय फायदा होणार? 


1) नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील प्रदेशाचा भौतिक व आर्थिक विकास मोठ्या प्रमाणावर होणार आहे


2) प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाशी वेगवान दळणवळण शक्य होणार आहे. त्याशिवाय, मुंबई पोर्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट यांचे दरम्यान वेगवान दळणवळण शक्य होणार आहे. 


3) मुंबई, नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्ग यामधील अंतर सुमारे 15 किमी कमी झाल्यामुळे इंधन, वाहतूक खर्च आणि मौल्यवान वेळेत सुमारे एका तासाची बचत होणार आहे.


4) मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.