मुंबई : मुंबईतील (Mumbai News) प्रवाशांना येत्या 26 सप्टेंबरपासून अडचणीचा सामना करावा लागणार आहे.याचे कारण म्हणजे  उदय सामंत यांनी दिलेला शब्द न पाळल्याचा आरोप करत मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांनी पुन्हा एकदा 26 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर  जाणार असल्याचे जाहीर केले आहे.


दिवसेंदिवस होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे टॅक्सी आणि रिक्षाचालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उत्पन्नातील जास्तीत जास्त पैसे हे सीएनजी भरण्यासाठी जात असल्याने भाडेवाढ मिळावी, या मागणीसाठी मुंबई टॅक्सी चालक 15 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत  होते.  मात्र, 13 सप्टेंबरला झालेल्या बैठकीत उदय सामंत यांनी विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करत संप मागे घेण्याची विनंती केली. मात्र  उदय सामंत यांनी बैठकीत दिलेला शब्द न पाळल्याचा आरोप करत मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांनी पुन्हा एकदा बेमुदत संपावर जाणार असल्याचे जाहीर केले आहे. मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने परिपत्रक काढत हा निर्णय जाहीर केला आहे.




 रिक्षा टॅक्सी युनियन आणि सरकारमध्ये यासंदर्भात वारंवार बैठका झाल्या. पत्रव्यवहार झाला मात्र सरकार आश्वासन देते, तोडगा काहीच नाही. त्यामुळे रिक्षा टॅक्सी चालक आता आंदोलन करणारच या भूमिकेत आहेत. यामुळे सर्वसामान्य माणूस हा भरडला जाणार आहे. आधीच सर्व वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. कोरोनाच्या परिस्थितीनंतर कशीबशी परिस्थिती सावरत आहे.  त सर्वसामान्य माणसाला काय करावं हे कळेना. त्यातच आता रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ किंवा संप या दोन्हींमध्ये  सर्वसामान्य माणूस हाच चेपला जाणार आहे.


टॅक्सी युनियनने भाडे 25 रुपयावरून 35 रुपयाची वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आधीच महागाई, त्यात भाडेवाढीने अधिक  मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे. भाडेवाढ व्हावी यासाठी रिक्षा टॅक्सी आंदोलन करणार आहेत. त्यातच  सरकारने आणि या युनियनने बसून काहीतरी  मार्ग काढायला हवा, अन्यथा  सर्वसामान्यांचे हाल होणार आहे