मुंबई : मुंबईतील घाटकोपरमध्ये दहावीचा विद्यार्थी खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाला आहे. विवेक घडशी असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजे शनिवारी (7 मार्च) दहावीची परीक्षा देण्यासाठी विवेक सायकलवरुन जात असताना हा अपघात झाला. त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाल्याचा आरोप होत आहे.


घाटकोपरमधील कातोडीपाडा रोड या ठिकाणी रस्त्यावर मलनिस:रण वाहिन्यांचं काम सुरु आहे. इथे मोठा खड्डा खोदण्यात आला होता. मात्र रस्ता रहदारीचा असूनही इथे बॅरिकेड्स लावण्यात आलेले नाहीत. विवेक घडशी परीक्षेसाठी सायकलवरुन जात असताना त्याचा तोल गेला आणि तो खड्ड्यात पडला. यावेळी खड्ड्यातील लोखंडी सळ्या त्याच्या उजव्या डोळ्यात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

विशेष म्हणजे यावेळी विद्यार्थ्याच्या मदतीला कोणीही पुढे आलं नाही. बॅरिकेट्स लावले नसल्याने विद्यार्थ्याला खड्ड्याचा अंदाज आला नाही आणि त्याचा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. अपघात झाला त्यावेळी या ठिकाणी कोणतेही बॅरिकेड्स नव्हते. अपघात झाल्यानंतर इथे बॅरिकेड्स लावण्यात आले आणि रस्त्यावर स्लॅब टाकण्यात आला आहे.

काम सुरु असताना सुरक्षेची काळजी घेणं, उपाययोजना करणं, बॅरिकेड्स लावणं हे महापालिकेचं प्राथमिक कर्तव्य आहे. परंतु महापालिकेने ही काळजी घेतली नाही, परिणामी याचा फटका दहावीच्या विद्यार्थ्याला बसला आहे. त्याचं दहावीचं वर्ष आता वाया गेल्यातच जमा आहे.