मुंबई : सीजेपीच्या मुंबईतील आंदोलनावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून त्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची एन्ट्री झाली आहे. शिवाजी पार्क परिसरात हे दोन्ही पक्ष आक्रमक झाले असून त्यांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, शिवसेना भवनसमोर पोलिसांनी शिवसैनिकांना अटकाव केल्यानंतर आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. शिवसैनिकांना हात लावाल तर महाराष्ट्र बंद पाडू, असा इशारा त्यांनी पोलिसांना दिला. तर आमदार अनिल परबही पोलिसांवर चांगलेच भडकल्याचं दिसून आलं.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा यासाठी कॉकरोच जनता पार्टीकडून दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे. त्याचवेळी मुंबईतील शिवाजी पार्कवरही सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवत आंदोलकांना ताब्यात घेतलं.
शिवसेना भवनासमोर मोठा राडा
दरम्यान, शिवसेना भवनच्या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त ठेवत शिवसेनेच्या नेत्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांची त्या ठिकाणी एन्ट्री झाली.
शिवसैनिकांना ताब्यात घेऊ नये अशी मागणी करत आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवनसमोर ठिय्या मांडला. त्यांच्यासोबत यावेळी तेजस ठाकरेदेखील होते. त्यावेळी पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आदित्य ठाकरे हे चांगलेच आक्रमक झाले. शिवसैनिकांना हात लावू नका, अन्यथा महाराष्ट्र बंद पाडू, असं म्हणत आदित्य ठाकरे भडकले. त्यांच्याोसोबत असलेले आमदार अनिल परबही यावेळी पोलिसांवर भडकल्याचं दिसून आलं.
आदित्य ठाकरे यांनी पोलीस व्हॅनच्या दरवाज्यावर चढत ती गाडी अडवली. यावेळी शिवसैनिकांनी पोलिसांची गाडी अडवली. सुमारे दहा ते 15 मिनिटे हा राडा सुरू होता. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शिवसैनिकांना सोडून दिलं.
अमित ठाकरे आक्रमक, मनसैनिकांनी पोलीस गाडी अडवली
दरम्यान, सीजेपीच्या आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर अमित ठाकरेही आक्रमक झाल्याचं दिसून आलं. आंदोलक करण्याचा अधिकार सर्वांनाच असून तुम्ही त्यांना ताब्यात का घेताय, असा प्रश्न त्यांनी विचारला. दरम्यानच्या काळात मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर मनसैनिक अधिकच आक्रमक झाल्याचं दिसून आलं.
ही बातमी वाचा:
