Mumbai Rains: गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rains) सुरू असून, आता पावसाचा जोर अधिकच वाढलेला आहे. पुढील 48 तास मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (IMD) मुंबई (Mumbai) आणि ठाणे (Thane) जिल्ह्यासाठी पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Continues below advertisement


मुंबईतील कुर्ला, सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता, अंधेरी आणि परळ या सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः दक्षिण मुंबईतील किंग्ज सर्कल परिसरात गुडघाभर पाणी साचले असून, नागरिकांना त्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. तसेच पश्चिम उपनगरातील अंधेरी पश्चिम परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे जे.पी. रोड, मिलन सबवे आणि एलबीएस मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली असून, वाहनचालकांसह सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे.


शाळांना सुट्टी जाहीर


भारतीय हवामान विभागाने बृहन्मुंबई क्षेत्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, सकाळपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबईतील दुसऱ्या सत्रातील अर्थात दुपारी 12 वाजेनंतर भरणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सोमवार, दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी सुटी जाहीर केली आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, पालघरला ऑरेंज ॲलर्ट जारी करण्यात आला असून ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आलेले नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.


मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त भागाचा आढावा


राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतत आढावा घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पूरग्रस्त भागांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागातील स्थितीची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला आहे. प्रशासनाच्या तयारीची, मदत कार्याची व आपत्कालीन यंत्रणांच्या कामकाजाची माहिती मुख्यमंत्री स्वतः घेत आहेत.


मुंबईत इतक्या पावसाची नोंद


मुंबईत 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8:30 ते 11:30 दरम्यान पडलेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे 


टाटा पॉवर, चेंबूर: 91.5 मिमी


विक्रोळी: 78.5 मिमी


जुहू: 60.0 मिमी


सायन: 58.5 मिमी


बांद्रा: 50.0 मिमी


सांताक्रूझ: 47.2 मिमी


कोलाबा: 29.0 मिमी



इतर महत्त्वाच्या बातम्या 


मुंबईत पावसाचा कहर, मध्य, हार्बर आणि वेस्टर्न रेल्वेमार्गावर लोकल किती मिनिटं लेट? जाणून घ्या, लेटेस्ट अपडेट्स


घाम गाळून उगवलेलं 'हिरवगार' सोनं डोळ्यांदेखत पाण्यात बुडालं, धाराशिवमध्ये पावसाचा हाहा:कार, बळीराजावर संकट