Mumbai Rains मुंबई: मुंबईसह पश्चिम उपनगरात आज (18 ऑगस्ट) पहाटेपासून जोरदार पाऊस (Mumbai Rains) सुरू आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. जर असंच काही वेळ जोरदार पाऊस सुरू राहिला तर पश्चिम उपनगरात जे सखल भाग आहे. त्या ठिकाणी पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.

Continues below advertisement


आज आठवड्याचा पहिला दिवस आणि आजही मुंबईत जोरदार पाऊस पडतोय. यामुळे सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्याना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तसेच पूर्व मोसमी पश्चिम द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे याचा प्रभाव म्हणून सध्या संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला असल्याचं हवामान खात्याच म्हणणं आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याच पाहिला मिळत आहे यामुळे थोड्याफार प्रमाणात रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सध्या मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक पाच ते दहा मिनिटं उशिराने, हार्बर रेल्वे (Harbour Railway) पाच मिनिटे उशिराने तर पश्चिम रेल्वेची (Western Railway) सुरळीत सुरू आहे. पावसाचा जोर आणखी वाढला तर रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम होऊ शकतो. 


मुंबईत कुठे किती पाऊस? (पहाटे५.३० पर्यंतच्या २४ तासांत) 


- टाटा पॉवर चेंबूर  ८१.५ मिमी
- सांताक्रूझ  ७० मिमी
- विक्रोळी  ६९ मिमी
- सायन  ६७ मिमी
- जुहू   ५८ मिमी
- भायखळा  ५८ मिमी
- बांद्रा  ५४ मिमी
- कुलाबा  २२ मिमी 


मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठी वाढला-


मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी रात्रीपासून होणाऱ्या  पावसामुळे जलसाठा वाढला आहे.सध्या धरणांत पाणीसाठा 90 टक्क्यांवर पोहोचला असून, वर्षभराची तहान भागेल एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांतून रोज 3900 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो.सातही धरणांची साठवण क्षमता 14.47 लाख दशलक्ष लिटर असून आता धरणांत 13 लाख दशलक्ष लिटर साठा आहे.


पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा-


पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट, तर पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील घाट परिसराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणामध्ये मुसळधार याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार कोकणातल्या बहुतांश भागात मध्यरात्रीपासून पाऊस आहे. किनारी भागांमध्ये देखील वाऱ्याचा वेग असून पाऊस जोराचा आहे. मध्यरात्री जोरदार बॅटिंग केलेल्या पावसाने पहाटेपासून देखील मुसळधार बरसायला सुरुवात केली आहे.




संबंधित बातमी:


Maharashtra Rain Weather alert : मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला रेड अलर्ट; राज्यभरासाठी IMDचा अंदाज काय?