Mumbai Rain Updates: मुंबई : मुंबईसह (Mumbai Rain Updates) संपूर्ण महाराष्ट्रावर (Maharashtra Monsoon) वरुणराजानं कृपादृष्टी केल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही तासांपासून मुंबईसह उपनगरांत जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, पुढचे तीन ते चार तास मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
गेल्या काही तासांपासून मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. रविवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचलं आहे. अशा परिस्थितीत अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी लोकल सेवा धीम्या गतीनं सुरू आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशीच मुसळधार पावसानं घातलेल्या धुमाकुळामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
लोकलवर कुठे काय परिणाम?
- मध्य रेल्वेवरील कर्जत-खोपोली, कसारा येथून सीएसएमटी लोकल ठाण्यापर्यंतच धावत असून ती पुढे रद्द करण्यात आली आहे.
- भांडुप स्थानकावरील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. याचा परिणाम मध्य रेल्वे मार्गावर झाला आहे.
- कुर्ला-मानखुर्द स्थानकात रेल्वे रुळावर पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
- वडाळ्यात पाणी साचल्यानं गोरेगाव-सीएसएमटी लोकल पुढील सूचना मिळेपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
पुढचे तीन ते चार तास मुसळधार पावसाचा इशारा
पुढील 3-4 तास मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 3 तासानंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवला आहे. मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात मागील 24 तासांत काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघरमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 8 जुलै ते 10 जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबईमधे गेल्या सहा तासांत मुसळधार पावसाची नोंद
रात्री 1 ते सकाळी सातपर्यंत अनेक ठिकाणी 300 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.
पूर्व उपनगरात सर्वाधिक पावसाची नोंद
- दादर : 316 मिमी
- पवई : 315 मिमी
- डोंगरी : 292 मिमी
- चकाला : 278 मिमी
- आरे कॉलनी : 259 मिमी
- जेव्हीपीडी : 255 मिमी
- भायखळा : 241 मिमी
- चेंबूर : 221 मिमी
- सायन : 220 मिमी
मुंबई शहर आणि उपनगरांत मध्यरात्री 1 वाजेपासून सकाळी 7 वाजेदरम्यान सर्वाधिक पाऊस कोसळलेली ठिकाणं आणि पावसाचे प्रमाण...
- वीर सावरकर मार्ग महानगरपालिका शाळा (315.6 मिमी)
- एमसीएमसीआर पवई (314.6 मिमी)
- मालपा डोंगरी महानगरपालिका शाळा (292.2 मिमी)
- चकाला महानगरपालिका शाळा (278.2 मिमी)
- आरे वसाहत महानगरपालिका शाळा (259.0 मिमी)
- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महानगरपालिका शाळा (255.0 मिमी)
- नारीयलवाडी शाळा (241.0 मिमी)
- जिल्हाधिकारी वसाहत (कलेक्टर कॉलनी) महानगरपालिका शाळा (221.2 मिमी)
- प्रतीक्षानगर महानगरपालिका शाळा (220.2 मिमी)
- नूतन विद्यामंदिर (190.6 मिमी)
- लालबहादूर शास्त्री मार्ग महानगरपालिका शाळा (189.0 मिमी)
- शिवडी कोळीवाडा महानगरपालिका शाळा (185.8 मिमी)
- रावळी कॅम्प (176.3 मिमी)
- धारावी काळा किल्ला महानगरपालिका शाळा (165.8 मिमी)
- बी. नाडकर्णी उद्यान महानगरपालिका शाळा (156.6 मिमी)
मुंबईत पावसाची कोसळधार
मुंबई आणि उपनगरांत आज मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक भागांत पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली आहे. तसेच, पावसाचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कसारा ते टिटवाळा स्थानकांदरम्यान रुळांवर झाड पडल्यानं लोकल सेवा ठप्प आहे. कल्याण ते कसारा दरम्यान ट्रॅकवर डोंगराची माती पडून ओएचईला आधार देणारा खांब वाकल्याची घटना घडली. पनवेल-कळंबोली परिसरात ट्रॅक पाण्याखाली गेला आहे.