मुंबई : रविवारी संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस अजूनही कायम असून त्यामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसतंय. आताही पुढील तीन ते चार तासांसाठी मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटीसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचवेळी जोरदार वारेही वाहणार असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं. त्यामुळे जर गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन मुंबईकरांना करण्यात आलं आहे.
मुंबईत रविवारपासून सुरू झालेला पाऊस सोमवारीही कायम आहे. गेल्या 24 तासांमध्ये मुंबईत 135.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरांत 19 मिमी पावसाची नोंद झाली तर पश्चिम उपनगरात 15 मिमी पाऊस झाला. सायनमध्ये 43 मिमी तर मुंबई विमानतळ भागात 33 मिमी पाऊस झाला.
Mumbai Hindmata Rain Update : हिंदमातामध्ये पुन्हा पाणी साचलं
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह पनवेल, रायगडमध्ये पाणी साचलं. किंग्ज सर्कल, हिंदमातासारख्या सखल भागात पाणी साचलं आहे. तर मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर पाणी साचलं. तर केईएम रुग्णालयातही पाणी शिरलं. बदलापूरही मुसळधार पावसाचा फटका बसला. पनवेलमध्ये पावसचं पाणी घरात शिरल्याने नागरिकांचं मोठं नुकसान झालं. याशिवाय रायगडमध्ये पूल पाण्याखाली गेला आहे.
Mumbai Aqua Line Metro Ration : भूयारी मेट्रो स्थानक जलमय
तब्बल 16 दिवस आधीच मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनच्या पावसाने मुंबईकरांसह आणि प्रशासनाची चांगलीच त्रेधातिरपीट उडवली. पहिल्या पावसात मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा बोजवारा उडाला. मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये आणि रेल्वे रुळांवर पाणी साचल्याचे दिसून आले. यात आता यामध्ये भूमिगत मेट्रोचीही भर पडली आहे.
आरे जेव्हीएलआर ते वरळी ही मेट्रो-3 मार्गिका नुकतीच पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच वरळी ते मरोळ या मार्गिकेचे सरकारकडून लोकार्पण करण्यात होते. मात्र मुंबईच्या पहिल्याच पावसात भुयारी मेट्रोच्या वरळी आचार्य अत्रे स्थानकात पाणी शिरले. हे पाणी आचार्य अत्रे मेट्रो स्थानकाच्या छतातून खाली कोसळत होते. छतातून कोसळणाऱ्या पाण्याच्या धारांमुळे संपूर्ण स्थानक जलमय झाले होते. त्यामुळे ॲक्वा लाईन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो-3 चे आचार्य अत्रे स्थानक खरोखरच जलमय झाले होते.
Mumbai Monsoon Update : मुंबईमध्ये मान्सून लवकर धडकला
राज्यासह आता मुंबईत देखील मान्सून दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तसेच मान्सूनने मुंबईत दाखल होण्याचा रेकॉर्ड देखील मोडला आहे. सरासरी मान्सून मुंबईत दाखल होण्याची तारीख 11 जून आहे. यंदा मान्सून 16 दिवस आधीच मुंबईत दाखल झाला आहे. यंदा पहिल्यांदाच मान्सून लवकर धडकला. याआधी मान्सून 1956, 1962 आणि 1971 मध्ये 29 मे रोजी मुंबईत दाखल झाला होता. मात्र यंदा पहिल्यांदाच मान्सून मुंबईत लवकर धडकला आहे. मान्सून 26 मे रोजी मुंबई दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे.