Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पाचे शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रवाशांच्या सोयीसाठी सुरु करण्यात आलेल्या या मिसिंग लिंकचा लोकार्पण सोहळा मात्र चांगलाच वादात सापडला. मिसिंग लिंकच्या लोकार्पण सोहळ्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai Pune Express Way) सामान्य प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे वैतागलेल्या प्रवाशांनी सरकारला शिव्यांची लाखोली वाहिली. मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासातील 25 ते 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. मात्र, लोकार्पण सोहळ्यानंतर एका  वेगळ्याच गोष्टीची चर्चा रंगली होती. (Mumbai Pune Missing Link Project)

मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प हा एकूण 10.5 किलोमीटर लांबीचा आहे. यामध्ये दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे 182 मीटर उंच केबल-स्टेड पूलाचा समावेस आहे. सुमारे 23.75 मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. 70 किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. लोणावळा तलावाच्या 182 मीटर खालून हा रस्ता गेला आहे. 

मिसिंग लिंकच्या लोकार्पण सोहळ्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ बैलाचा बळी दिल्याचा दावा करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ रक्त सांडल्याचे दिसत आहे. काही कामगार हे रक्ताचे डाग धुताना दिसत आहेत. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, याबाबत एमएमआरडीसीचे अधिकारी आणि कामगारांना विचारले असता त्यांनी आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगत मौन बाळगणे पसंत केले. तर पोलिसांकडून हा व्हिडीओ जुना असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मिसिंग लिंकच्या बोगद्यापाशी खरोखरच बैलाचा बळी देण्यात आला होता का, व्हिडीओत कामगार रस्त्यावर ज्या रक्ताचे डाग धुवत होते, ते रक्त कुठून आले, असे अनेक प्रश्न या व्हिडीओमुळे उपस्थित झाले आहेत. याबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी सरकारकडून कोणी याबाबत भाष्य करणार का, हे आता बघावे लागेल.

आणखी वाचा

वर्क फ्रॉम होमवाले लोक मध्ये आले होते..; मिसिंग लिंकचे लोकार्पण, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला, फडणवीसांचं कौतुक

मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीत प्रवासी अडकले, संतापले; एकनाथ शिंदे म्हणाले, टोल घेऊ नका, अधिकाऱ्यांना निर्देश

Mumbai-Pune Expressway Missing Link project: महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट; वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, कसा आहे मिसिंग लिंक प्रकल्प, फायदा काय?, A टू Z माहिती