मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर कोंडी झाल्यानंतर ज्यांच्याकडून टोल वसूल करण्यात आला होता अशांना येत्या आठ दिवसात टोलचे पैसे परत करण्याचं आश्वासन IRB कंपनीने दिलं आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत खालापूर टोल नाका येथे झालेल्या बैठकीत हे आश्वासन देण्यात आलं आहे. यावेळी वाहतूक पोलीस अधिकारीही उपस्थित होते. 

Continues below advertisement

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर 3 फेब्रुवारी रोजी प्रोपलिन हा ज्वलनशील वायू वाहून नेणारा टँकर उलटल्यामुळे तब्बल 32 तास भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अशा गंभीर परिस्थितीतही IRB कंपनीने प्रवाशांकडून टोल वसुली केल्याच्या निषेधार्थ MSRDC, IRB तसेच वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांसमवेत खालापूर टोल नाका येथे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

Mumbai Pune Expressway Traffic : टोल वसुली, मात्र सुविधा नाहीत

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत, कोंडीदरम्यान वसूल केलेला टोल प्रवाशांना परत करण्याची ठाम मागणी केली. टोल वसूल करून केवळ स्वतःचे खिसे भरण्याचं काम कंत्राटदार असलेली IRB कंपनी करत आहे, मात्र तुलनेने सुविधा मात्र नगण्यच असल्याचा आरोप मनसेने केला. त्यामुळेच द्रुतगती मार्गावर नवजात बालकांच्या मातांसाठी स्तनपानगृह, प्रसाधनगृहांची व्यवस्था, अवैध टोइंगचा त्रास इत्यादी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवरही अधिकाऱ्यांचे लक्ष यावेळी पदाधिकाऱ्यांकडून वेधण्यात आले.

Continues below advertisement

यावर सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या मागण्या मान्य करत लवकरात लवकर कारवाई करण्याचा सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच कोंडीदरम्यान वसूल केलेला टोल येत्या आठ दिवसांत परत करण्याबाबत आश्वासन देण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस प्रदीप वाघमारे यांनी दिली.  

आडोशी बोगद्याजवळ टँकर उलटल्याने वाहतूक कोंडी

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर 3 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास, आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील, प्रोपलीन गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटला आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्काळ ठप्प झाली.

एकीकडे वाहनांच्या तुडुंब रांगा लागलेल्या असताना, प्रवाशांच्या होणाऱ्या हालअपेष्टांकडे दुर्लक्ष करत, टोल वसूलीची धाड मात्र सुरूच होती. या कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना मात्र कोणीच वाली उरलेला नाही अशी खंत प्रवाशांनी बोलून दाखवली. टोल घेणारे आणि प्रशासन चालवणाऱ्यांनी प्रवाशांना वाऱ्यावर सोडल्याचं चित्र दिसून आलं होतं. 

ही बातमी वाचा: