Mumbai Powai Encounter: वेब सिरीजमध्ये कास्टिंग करण्याच्या नावाखाली तब्बल 19 जणांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या किडनॅपरचा एन्काऊंटर करण्यात आला. पवई पोलिसांकडून 17 मुलांसह 19 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र, यावेळी झालेल्या चकमकीमध्ये रोहित आर्या गंभीर जखमी झाला होता. यावेळी रोहित आर्याने पोलिसांवरती फायरिंग केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या क्रॉस फायरिंगमध्ये छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली होती. लहान मुलांची सुखरुप सुटका केल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमध्ये एक लहान मुलगी आणि एक वृद्ध महिला सुद्धा जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
आरोपी रोहितला बोलण्यात गुंतवून दुसऱ्या बाजूने बाथरुममधून प्रवेश
आज दुपारी पावणेदोनच्या सुमारास पवई पोलीस स्टेशनमध्ये मुलांना ओलिस ठेवल्याची माहिती दिली पोलिसांची एकच धावपळ उडाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत एका बाजूने आरोपी रोहितला बोलण्यात गुंतवून दुसऱ्या बाजूने बाथरुममधून प्रवेश करत मुलांची सुटका केली. पोलिसांनी तासाभरात 19 जणांची सूटका केली. घटनास्थळावरून एअर गन आणि रसायने जप्त करण्यात आली होती. तथापि, आरोपी रोहित आर्यचा हेतू अद्याप अज्ञात आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने 100 हून अधिक मुलांना ऑडिशन्ससाठी बोलावले होते. रा स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावर अभिनयाचे वर्ग सुरू आहेत, जिथे मुलांना ओलीस ठेवण्यात आले होते. घटनेदरम्यान, मुले स्टुडिओच्या खिडक्यांमधून बाहेर डोकावताना दिसली. त्यांचे पालकही आले होते. मुलं लंचसाठी बाहेर न आल्याने शंका बळावली आणि पालकांची घालमेल सुरु झाली.
आरोपी रोहित म्हणाला, 'मला फक्त काही प्रश्न विचारायचे आहेत'
रोहितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही समोर आला होता, ज्यामध्ये तो म्हणत होता की, "मी रोहित आर्य आहे. आत्महत्या करण्याऐवजी मी एक योजना आखली आहे आणि इथं काही मुलांना ओलीस ठेवत आहे. माझ्या फारशा मागण्या नाहीत. माझ्या खूप साध्या मागण्या आहेत, नैतिक मागण्या आहेत आणि काही प्रश्न आहेत. मला काही लोकांशी बोलायचे आहे, त्यांना प्रश्न विचारायचे आहेत आणि जर त्यांच्या उत्तरांच्या उत्तरात मला काही प्रश्न असतील तर मी त्यांनाही विचारू इच्छितो, पण मला ही उत्तरे हवी आहेत." "मला दुसरे काहीही नको आहे. मी दहशतवादी नाही, किंवा मी खूप पैसे मागत नाही आणि मी कोणतीही अनैतिक मागणी करत नाही. मी योजनेचा भाग म्हणून मुलांना ओलीस ठेवले आहे. जर मला थोडीशीही चिथावणी दिली गेली तर मी या जागेला (स्टुडिओला) आग लावीन. आत्महत्या करण्याऐवजी मी ही योजना आखली आहे. मला चिथावू नका, नाहीतर मी मुलांना हानी पोहोचवणारी पावले उचलेन."
इतर महत्वाच्या बातम्या