नितेश राणेंकडून मुंबईतील खड्ड्यांचे फोटो प्रदर्शन; मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंना निमंत्रण
एबीपी माझा वेब टीम | 09 Jul 2016 03:21 PM (IST)
मुंबई: दरवर्षीप्रमाणे मुंबईत पुन्हा एकदा खड्ड्यांची बजबजपुरी माजली आहे. मुंबईत फक्त ६६ खड्डेच आहेत, असा दावा करणाऱ्या मुंबई महापालिकेला मुंबईतील खड्डे दाखवून देण्यासाठी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी मुंबईत ‘खड्डे मोजा मोहीम’ राबवली. या ‘खड्डे मोजा मोहिमेअंतर्गत’ मुंबईतील विविध ठिकाणच्या जवळपास ४५० खड्ड्यांची मोजणी करून या खड्ड्यांची विभागवार छायाचित्रे काढण्यात आली आहेत. या खड्ड्यांची मोजणी पूर्ण करून त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन १२ जुलै रोजी आझाद मैदान येथील मुंबई मराठी पत्रकार संघात भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे निमंत्रण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापौर स्नेहल आंबेकर यांनाही देण्यात आले आहे. ‘मुंबईत खड्डे की खड्ड्यात मुंबई’ असं या छायाचित्र प्रदर्शनाला नाव देण्यात आलं आहे.