मुंबई: मुंबईतील खड्ड्यांनी मुंबईकर त्रस्त झाले असले तरी या खड्ड्यांना एक अनोखा बहुमान प्राप्त झाला आहे. मुंबईच्या खड्ड्यांना वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया बुकचे 'गोल्ड मेडल' मिळाले असून याबाबतचे प्रमाणपत्र, सुवर्ण पदक व गोल्डन फ्रेम ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक’ कडून प्राप्त झाले आहे. मात्र गिनिज रेकॉर्ड बुक आणि लिम्का रेकॉर्ड बुकने ही नोंद करण्यास नकार दिला आहे.


मुंबईतील रिपाइं (ए) रोजगार आघाडी महाराष्ट्र सरचिटणीस नवीन लादे यांनी सुरू केलेल्या ‘मुंबईचे खड्डे वर्ल्ड बुकांमध्ये’ या अभियानाची नोंद वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया बुकमध्ये झाली आहे.

पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे होणारा त्रास, अपघात आणि समस्या यावर उपाय म्हणून लादे यांनी मुंबईतील खड्ड्यांची आकडेवारी मोजण्यासाठी मुंबईकरांना खड्ड्यांची छायाचित्रे पाठविण्याचे आवाहन 17 जुलै 2018 रोजी केले होते.

या आव्हानासोबत अनेक मुंबईकरांनी जागोजागी असणाऱ्या खड्ड्यांची छायाचित्रे mumbaipotholes.com या संकेतस्थळावर पाठवली. यामुळे मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची आकडेवारी 38 दिवसांत समोर आली. आता या खड्ड्यांच्या आकडेवारीची वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये नोंद झाली आहे.  या संकेतस्थळावर खड्ड्यांची आकडेवारी 26,934 एवढी नोंदवली गेली.