मुंबई: दादरमधील कबूतरखाना आंदोलन प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेने कबूतरखाना ताडपत्रीने झाकला होता. मात्र या कारवाईचा विरोध करत ६ ऑगस्ट रोजी जैन समाजाने मोठ्या संख्येने जमाव जमवून आंदोलन केले. यावेळी ताडपत्री फाडून बांधलेले बांबू उचकटण्याचा प्रयत्न जमावाकडून करण्यात आला होता. या संदर्भात सुरुवातीला पोलिस पालिकेच्या तक्रारीची वाट पाहत होते. मात्र पालिकेकडून तक्रार न आल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून दादर पोलिस ठाण्यात १५० जणांविरोधात गुन्हा नोंदवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. कबुतरांच्या विष्ठेमुळे परिसरात आजारांचा प्रसार वाढत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानंतर महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घातली. परंतु या कारवाईला जैन समाजाकडून तीव्र विरोध करण्यात आला. त्यांनी हा धार्मिक प्रश्न असल्याचे सांगत राज्य सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचाही इशारा दिला.
आरोग्य समस्या, श्वसनाचे आजार, त्वचाविकार, वाहतुकीतील अडथळे या कारणास्तव कबूतरखाना बंद करण्याची गरज असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. दुसरीकडे, जैन समाजाला यामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा प्रश्न दिसत असून या प्रकरणामुळे सार्वजनिक आरोग्य व धार्मिक भावना यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याचे चित्र आहे.
नेमकं काय घडलं त्या दिवशी?
दादरच्या कबुतरखान्यावरती महानगरपालिकेने लावलेली ताडपत्री हटवण्यासाठी 6 ऑगस्ट रोजी जैन समाज आक्रमक झाला. कबुतरखान्यावरील ताडपत्री जैन समाजातील महिलांनी स्वत: काढली. बांधलेले बांबू देखील त्यांनी हटवले. मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. कबुतरांमुळे परिसरात आजार वेगाने पसरत असल्याचं न्यायालयाने सांगितलं. यानंतर महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घातली. कबुतरांना खायला घातल्यास दंडही आकारण्यात येऊ लागला, कबुतरखाने बंद केल्यानंतर जैन समाजाकडून तीव्र विरोध झाला. दादरमधील कबुतरखाना अचानक बंद करणं चुकीचं असल्याचं सांगण्यात आलं. राज्य सरकारशी चर्चा करून सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा दिला गेला.
6 ऑगस्ट रोजी सकाळी कबुतरखान्यात जैन समाजाने प्रार्थना सभा आयोजित केली होती. सुरुवातीला काही जैन बांधवांनी आदेश पाळण्याची तयारी दर्शवली. मात्र अचानक काहींनी ताडपत्री फाडून हटवण्यास सुरुवात केली. कबुतरांच्या विष्ठेमुळे परिसरात अनेक आरोग्य समस्या उद्भवत होत्या. श्वसनाच्या तक्रारी, त्वचाविकार यामध्ये वाढ झाली होती. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार होती. कबुतरांना खायला घालणं म्हणजे सार्वजनिक उपद्रव असल्याचं न्यायालयाने नमूद केलं. ही आरोग्याची समस्या असल्याने कठोर पावलं उचलण्याचे निर्देश दिले. एफआयआर नोंदवण्याचे आदेशही बीएमसीला दिले गेले. महापालिकेने ताडपत्री लावून कबुतरखाना बंद केला होता. यामुळे जैन समाजाने मोर्चा काढत संताप व्यक्त केला. त्यांनी हा धार्मिक मुद्दा असल्याचं सांगितलं. महापालिकेच्या कारवाईनंतर जैन समाज अधिक आक्रमक झाला. त्यांनी कबुतरखान्याच्या आजूबाजूला जोरदार निषेध केला. या वादामुळे धार्मिक आणि सार्वजनिक आरोग्याचा संघर्ष समोर आला.कबुतरांच्या विष्ठा, पिसे आणि परजीवींमुळे झुनोटिक आजार होतात. क्रिप्टोकोकोसिस, पोपट ताप, साल्मोनेलोसिस यांसारखे आजार यात आहेत. यामुळे सर्व वयोगटातील लोकांना धोका होतो.
