आयसिस दहशतवाद्यांच्या निशाण्यावर मुंबई पोलीस!
एबीपी माझा वेब टीम | 03 May 2017 09:09 AM (IST)
मुंबई: आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेशच्या एटीएसनं अटक केलेल्या मोहम्मद नाजिमनं धक्कादायक खुलासे केले आहेत. पोलिसांवर हल्ला करून प्रसिद्धी मिळवण्याचा मोहम्मद नाजिम आणि त्याच्या साथीदाराचा कट होता अशी माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी एका मुंबई पोलीस अधिकाऱ्याची हत्या करण्यात येणार होती. तसंच मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याचाही कट आखण्यात आला होता. अशी धक्कादायक माहिती मोहम्मद नाजिमनं चौकशीदरम्यान उत्तर प्रदेशच्या दहशतवादी विरोधी पथकाला दिली आहे. त्या अनुषंगानं मुंबई पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मोहम्मद नाजिमला मुंबई लगतच्या मुंब्रा परिसरातून अटक करण्यात आली होती. तर त्याच्या तीन साथीदारांना देशाच्या वेगवेगळ्या भागातून ताब्यात घेण्यात आलं होतं. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींची सध्या कसून चौकशी सुरु असून त्यांच्याकडून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.