Mumbai Maratha Protest: गेल्या चार दिवसांपासून दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत हजारो मराठा बांधव गाड्या घेऊन मुंबईत दाखल झाले होते. आझाद मैदानात मर्यादित जागा असल्याने अनेक मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज स्थानक (CSMT Railway station) आणि आजुबाजूच्या परिसरात आश्रय घेतला होता. एवढेच नव्हे तर अनेक मराठा आंदोलकांनी मंत्रालय, आमदार निवास, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, मरिनड्राईव्ह अशी भ्रमंती केली होती. काही मराठा आंदोलक हे मुंबईलगत असणाऱ्या भागांमध्ये आपल्या नातेवाईकांकडे मुक्कामाला होते. त्यासाठी या मराठा आंदोलकांना बस आणि ट्रेनने प्रवास करावा लागत होता. या प्रवासादरम्यान मराठा आंदोलक आणि प्रवाशांमध्ये बाचाबाची झाल्याचे काही व्हिडीओ समोर आले होते. याप्रकरणात आता मराठा आंदोलकांवर पहिला गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
जुहू परिसरातील एका प्रकरणात मराठा आंदोलकांवर हा गुन्हा दाखल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मराठा आंदोलक आणि बेस्ट बस प्रवाशांमध्ये झालेल्या मारहाणीप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुहू पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी जुहू बस स्थानकात आंदोलक आणि प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. यानंतर मराठा आंदोलकांनी हाणामारीत बसच्या काचा फोडल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय, सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मुंबई लोकल ट्रेनमध्ये मराठा आंदोलक आणि प्रवाशांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे दिसत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत आझाद मैदान वगळता सीएसएमटी स्थानक, मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर परिसर मंगळवारी दुपारपर्यंत खाली करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी वेगाने हालचाली करत सीएसएमटी आणि हुतात्मा चौकाचा परिसर पूर्णपणे खाली केला असून येथील वाहतूक पूर्ववत झाली आहे. तर आझाद मैदानात एक मोठा मंडप उभारला जात आहे. या मंडपात अडीच ते तीन हजार लोकांना थांबवण्याची व्यवस्था आहे. याशिवाय, सीएसएमटी परिसरातील मराठा आंदोलकांच्या सर्व गाड्या रस्त्यावरुन हटवण्यात आल्या असून याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदान खाली करण्याची नोटीस
न्यायालयाच्या निर्देशानंतर नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावल्याची माहिती समोर येत आहे. आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलिस यांनी देण्यात आलेल्या अटी व शर्तीचे उल्लघंन करण्यात आल्याने जरांगे पाटील यांनी मागितलेल्या आंदोलनाच्या परवानग्या नाकारण्यात आली आहे. आझाद मैदान पोलिसांन जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावून लवकरात लवकर आझाद मैदान खाली करण्याबाबत पत्रात म्हटले आहे. तसेच पत्रात जरांगे पाटलांनी प्रसार माध्यमांवर केलेल्या वक्तव्याची पोलिसांनी दखल घेत त्याचा उल्लेखही नोटीसमध्ये केला आहे
Mumbai Maratha Protest: आमच्यासाठी फक्त जरांगे पाटील हेच कोर्ट, ते म्हणाले तर मुंबई लगेच खाली करु: मराठा आंदोलक
मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलकांना आझाद मैदान सोडून इतरत्र थांबण्यास मनाई केली आहे. याबद्दल मराठा आंदोलकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. आम्हाला आझाद मैदानात जा म्हणून सांगत आहेत. मात्र आम्ही तिथ चिखलात बसणार कसे? आम्हाला सांगितलं जात आहे की, तत्काळ मुंबईतील इतर ठिकाणे खाली करा. आता पावसात आमची सुविधा नसेल तर आम्ही जाणार कुठे, खाणार काय ? रात्री पोलिसांनी गाड्या काढल्या. मात्र, पुन्हा आम्हाला गाड्या लावायची पुन्हा वेळ आली, कारण पार्किंग लांब दिलं आहे. सिमेंटची गोडाऊन दिली आहेत, तिथे थांबणार कसे काहीच सुविधा नाहीत. आमच्यासाठी कोर्ट फक्त जरांगे पाटील आहेत. ते म्हणाले तर लगेच मुंबई खाली करु, असे या मराठा आंदोलकांनी सांगितले.
आणखी वाचा
पोलिसांनी रस्त्यावरुन मराठा आंदोलकांच्या गाड्या हटवल्या, सीएसएमटी स्थानकाबाहेरचा रस्ता मोकळा