Vasai News: पालघरच्या वसई (Vasai) येथून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पतीसोबत स्कूटीवरून (Scooty) प्रवास करत असताना वाऱ्यामुळे विस्कटलेले केस बांधण्याचा प्रयत्न एका महिलेसाठी आयुष्यभराची जखम देणारा ठरला. केस बांधत असतानाच तिच्या हातातील एक वर्षाचं बाळ धावत्या स्कूटीवरून रस्त्यावर पडल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत चिमुकलीला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी तिला मुंबईतील केईएम रुग्णालयात (KEM Hospital) दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री तिची प्राणज्योत मालवली. मृत चिमुकलीचं नाव कृषा असं आहे. या घटनेमुळे भावसार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Vasai News: नेमकी घटना कशी घडली?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव पूर्व येथील योगेश भावसार (वय 35) हे शुक्रवारी दुपारी सुमारे 1.15 वाजता पत्नी आणि एक वर्षाची मुलगी कृषा हिच्यासोबत स्कूटीवरून जात होते. योगेश भावसार स्कूटी चालवत होते, तर त्यांची पत्नी मागे बसली होती. त्यांच्या हातात एक वर्षाची चिमुकली कृषा होती. तिघेही स्कूटी क्रमांक MH 04 HE 7470 वरून तिवारी रोडने प्रवास करत होते.

Vasai News: वाऱ्याने केस विस्कटले अन् घडला अनर्थ

प्रवासादरम्यान अचानक जोरदार वारा सुटला. त्यामुळे आईचे केस विस्कटून तिच्या चेहऱ्यावर येऊ लागले. केसांमुळे त्रास होत असल्याने तिने एका हातात मुलीला धरून दुसऱ्या हाताने केस बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र, केस बांधत असतानाच तिच्या हातातील चिमुकली कृषाची पकड सुटली. त्याच क्षणी कृषा धावत्या स्कूटीवरून थेट रस्त्यावर कोसळली. सगळं काही क्षणार्धात घडलं. मुलगी रस्त्यावर पडल्याचं लक्षात येताच योगेश यांनी तत्काळ स्कूटी थांबवली. आई-वडिलांनी धाव घेत चिमुकलीला उचललं.

Vasai News: डोक्याला गंभीर दुखापत; चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू

रस्त्यावर पडल्यामुळे कृषाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे पालकांनी तिला तातडीने मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. रुग्णालयात डॉक्टरांनी चिमुकलीला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तिची प्रकृती गंभीर होती. अखेर शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान कृषाने अखेरचा श्वास घेतला. या दुर्दैवी घटनेमुळे भावसार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरातून अत्यंत हळहळ व्यक्त केली जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले