वसई – वसई-विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त आणि राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे नातेवाईक असलेले आयएएस अनिलकुमार पवार यांना ईडीने काल (बुधवारी) रात्री मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली. पवार यांच्यासह नगररचना उपसंचालक (निलंबित) वाय. एस. रेड्डी, माजी नगरसेवक व बांधकाम व्यावसायिक सीताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता या चौघांना ताब्यात घेण्यात आले. आज (गुरुवारी) सर्व आरोपींना पीएमएलए न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Continues below advertisement

29 जुलै रोजी ईडीने मुंबई, पुणे, नाशिक आणि सातारा येथे एकाचवेळी 12 ठिकाणी छापेमारी करून 1 कोटी 33 लाख रुपये रोकड, मालमत्तेची कागदपत्रे, बँक डिपॉझिट स्लिप्स आणि डिजिटल उपकरणे जप्त केली होती. पवार आणि त्यांच्या पत्नी भारती पवार यांची यानंतर कसून चौकशी करण्यात आली. नाशिक आणि सटाणा येथील त्यांच्या मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले होते. ईडीच्या तपासात 2009 पासून वसई-विरार महानगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यावसायिक इमारतींच्या बांधकामात पवार आणि इतर अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे समोर आले. बांधकाम परवानगीसाठी प्रति चौरस फूट 20-25 रुपये आणि नगररचना उपसंचालकांकडून 10 रुपये प्रति चौरस फूट कमिशन घेतल्याचा आरोप आहे. शहरातील 41 बेकायदेशीर इमारतींच्या प्रकरणात त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले असून, या घोटाळ्यामुळे सुमारे अडीच हजार कुटुंब बेघर झाली.

तसेच, नालासोपारा (पूर्व) येथील आरक्षित भूखंडावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि कचरा डेपोसाठी राखीव जागेत इमारती बांधण्यात आल्याचे उघड झाले. या प्रकल्पांतर्गत विकासकांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे सदनिका विक्री करून सर्वसामान्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या अनधिकृत इमारती अलीकडेच पाडण्यात आल्या.

Continues below advertisement

फडणवीसांची नाराजी....

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच वसई-विरारमधील अनधिकृत बांधकाम घोटाळ्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. पवार यांनी त्यानंतर बदलीसाठी प्रयत्न केल्याची माहिती आहे. अखेर ईडीच्या तपासानंतर पवार यांच्यावर अटकेची कारवाई झाली असून, या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनिलकुमार पवार हे शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे नातलग आहेत. त्यामुळेच शिवसेना शिंदे पक्षाच्या जवळचे अधिकारी म्हणून ओळखले जात असल्याची चर्चा होती. शिंदे सरकारच्या काळातच पवार यांची ठाण्याचे अप्पर जिल्हाधिकारी व वसई-विरार महापालिका आयुक्तपदावर वर्णी लागली होती. वसई-विरारमधील अनाधिकृत बांधकाम घोटाळा उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांनी आयुक्तांना समज देखील दिली होती. अखेर ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यानंतर अनिल कुमार यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे पवारांवरील ठपका ?

वसई-विरार परिसरातील बांधकामात अनिलकुमार पवार यांनी मोठी भूमिका बजावल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे.

छापेमारीत आढळली रोकड

29 जुलै रोजी ईडीने अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानासह 12 ठिकाणी छापेमारी केली. नाशिक येथे त्यांच्या पुतण्याच्या घरी 1 कोटी 33 लाख रुपयांची रोकड आढळली होती. नातेवाइकांच्या नावे, तसेच बेनामी मालमत्तेची कागदपत्रेही आढळून आली होती. या प्रकरणात त्यांनी प्रति चौरस फूट 20 ते 25 रुपये दराने लाच स्वीकारल्याचे ईडीच्या प्राथमिक तपासात आढळले. तर, वाय. एस. रेड्डी या तत्कालीन नगर रचनाकाराने प्रति चौरस फूट 10 रुपये दराने 41 इमारतींसाठी लाचखोरी केल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे.