Mumbai News : मुंबईतील बहुसंख्य ठिकाणी पार्किंगच्या (Parking) नावाखाली अक्षरश: लूटमार सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे ही लूटमार आख्ख्या मुंबईत (Mumbai News) सुरु असल तरीही मंत्रालय, गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी यासारखी ठिकाणंही यापासून वाचली नाहीत.  नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबईत पार्किंगच्या नावाखाली जबरदस्ती जास्तीचे पैसे कशाप्रकारे उकळले जात आहेत हा मुद्दा गाजला. ठाकरेंचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी मांडलेल्या या मुद्यानंतर तरी जास्तीचे पैसे उकळण्याचे प्रकार बंद होतील अशी अपेक्षा होती. मात्र असं आढळलं नाही. याबाबतचा रियालिटी चेक एबीपी माझाने केला. 

Continues below advertisement

या रियालिटी चेकमध्ये हादरवून सोडणाऱ्या घटना समोर आल्या. पार्किंगवाल्याने आधी 1 तासाचे 100 रुपये सांगितले, त्याला त्याबाबत प्रश्न विचारले असता लगेच 70 तो रुपयांवर आला. मग पार्किंगच्या चिठ्ठीवर पैशांच्या उल्लेख का नाही? असे प्रश्न विचारल्यानंतर पार्किंगवाल्याकडून हातातून चिठ्ठी हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला.  हा प्रकार आहे मुंबईतील नरिमन पाँईट परिसरातील ट्रायडंट हाँटेल समोरचा.

पर्यटकांची लूट 

या परिसरात दररोज मुंबई आणि देशभरातून हजारो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. या पर्यटकांना अनेकवेळा सोबत आणलेल्या गाड्या लावायच्या कुठे हा प्रश्न पडतो आणि याचाच गैरफायदा घेण्याचा प्रयत्न हा अनाधिकृतरित्या खोट्या पावत्यांच्या आधारे पैसे उकळणाऱ्यांना करता येतो. 

Continues below advertisement

IPL मॅच बघण्यासाठी मुंबईत आसपासच्या शहरांतून, बाहेरुन अनेक क्रिकेटप्रेमी येतात. पुण्यातून एक क्रिकेटप्रेमी आला होता. त्यालाही पार्किंगवाल्यांनी अक्षरश: लुटला.  "मी  आयपीएलची मॅच बघायला आलो होतो. माझ्याकडून 4 तासांचे 600 रुपये घेतले, प्रत्यक्षात 200 रुपये होतात", असं या प्रेक्षकाने सांगितलं.

मंडळी हा प्रकार केवळ नरिमन पाँईट परिसरातच नाही तर मुंबईतील मरीन ड्राईव्ह, मंत्रालयासमोरचे पार्किंग, स्टेट्स हॉटेल, क्रॉफर्ट मार्केट, वरळी नाका, ओव्हर हायवे ब्रीज खालील अनाधिकृत पार्किंग या ठिकाणी हे प्रकार सुरु आहेत.

मुंबईत पार्किंगची वर्गवारी

मुंबईत पार्किंगची वर्गवारी करण्यात आली आहे. यामध्ये अ ब आणि क अशी वर्गवारी आहे. वर्गवारीनुसार मुंबईत पैसे घेणे बंधनकारक आहे. मात्र एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कुठेही नियमानुसार पैसे न घेता सर्वसामान्यांकडून जास्तीचे पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर सद्या अनेकांची करारपत्रे कंत्राटे न निघाल्यामुळे पुन्हा कालावधी वाढवून देण्यात आली आहेत. मात्र ज्यांना अधिकार नाही त्या महापालिकेच्या अभियंत्यांच्या सहीने देण्यात आली आहेत.

आमदार सुनील प्रभू यांनी सभागृहात आवाज उठवल्यानंतर केवळ 8 दिवसांसाठी हा प्रकार थांबला असल्याची बाब समोर आली. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा राजरोसपणे खुलेआम सामान्य नागरिकांकडून पैसे वसुलीचा प्रकार मुंबईत जोरदार सुरु आहे.

मुंबईत नुकताच पे अँड पार्किंगचे कंत्राट संपुष्टात आल्यानंतर परवानगी न घेताच परस्पर मुदतवाढ दिल्या प्रकरणी सहायक अभियंता पवन कावरे याला निलंबित करण्यात आलं आहे. परंतु केवळ एका अधिकाऱ्यावर कारवाई करून उपयोग नाही कारण मुंबईतील ट्रायडंट हॉटेल समोरचा रस्ता, स्टेटस हॉटेल यासह जमानलाल बजाज रोड, एम जे पी मार्केट रोड या ठिकाणी सुरू असलेला अनधिकृत पार्किंगचा धंदा अजूनही तेजीत आहे. यावर पालिका प्रशासन कारवाई करणार याकडे सर्वसामन्य नागरिकांच लक्ष आहे.

आणखी वाचा