मुंबई : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचे वारे आहे. उद्या (१५ जानेवारी) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर १६ जानेवारीला निकाल समोर येणार आहेत. अशातच सर्व राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई पालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) मतमोजणीबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकांप्रमाणे यावेळी शहरातील सर्व २२७ प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी होणार नाही. यंदा मतमोजणी टप्प्याटप्प्याने केली जाणार असल्याचे, समोर आले आहे.(Mumbai Municipal Corporation)

Continues below advertisement

BMC Election 2026: एकावेळी केवळ दोन प्रभागांची मतमोजणी केली जाईल

यंदाच्या महापालिका निवडणुकीत २०१७ प्रमाणे सर्व २२७ प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी होणार नाही. यावेळी मतमोजणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून, शुक्रवारी सकाळपासून ही प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती आहे. मुंबई शहरात एकूण २३ मतमोजणी अधिकारी असून, प्रत्येक अधिकारी साधारण दहा प्रभागांची जबाबदारी सांभाळणार आहे. मात्र, एकावेळी केवळ दोन प्रभागांची मतमोजणी केली जाईल. त्यामुळे संपूर्ण मुंबईत एकाच वेळी जास्तीत जास्त ४६ प्रभागांचेच मतमोजणीचे काम होणार आहे.

BMC Election 2026: मतमोजणीची प्रक्रिया अधिक जलद व सुरळीत पार पडण्यास मदत

अधिकाऱ्यांच्या मते, टप्प्याटप्प्याने मतमोजणी केल्यास उपलब्ध मनुष्यबळ एका वेळी कमी प्रभागांवर केंद्रित करता येईल आणि त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया अधिक जलद व सुरळीत पार पडण्यास मदत होईल. मात्र, या पद्धतीमुळे सर्व प्रभागांचे कल (ट्रेंड्स) मतमोजणी सुरू झाल्यानंतर लगेच स्पष्ट होणार नाहीत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे काही प्रभागांचे निकाल सकाळी जाहीर होतील, तर काही प्रभागांचे निकाल दुपारनंतर किंवा उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे निकाल जाहीर होण्याच्या वेळापत्रकाबाबत उत्सुकता वाढली आहे.

Continues below advertisement

त्यामुळे आता मुंबईत यावेळी महापालिका निकालांना वेळ लागणार आहे. एका वेळी दोनच प्रभागांची मतमोजणी होणार असल्यानं उशीर होण्याची शक्यता आहे, २२७ वॉर्डांची २३ केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. एका केंद्रावर एका वेळी दोनच वॉर्डांची मतमोजणी होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एका टप्प्यात ४६ याप्रमाणे पाच टप्प्यांत २२७ वॉर्डांची मतमोजणी पार पडणार आहे. एका मतमोजणी केंद्रावर जवळपास १० वॉर्डांची मतमोजणी होणार आहे.

राज्यात एकाचवेळी २९ महापालिकांच्या निवडणुका होत आहे. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील महापालिकांचा समावेश असून, १५ जानेवारी रोजी महापालिकांसाठी मतदान होणार आहे. तर १६ जानेवारीला निकाल जाहीर केले जाणार आहेत.