आजपर्यंत शिवसेनेला इतरांच्या पत्रकार परिषदा उधळताना बघितलं होतं, स्वत:च्या पत्रकार परिषदा गाजवताना बघितलं होतं, पण आज पहिल्यांदा शिवसेनेला कुणाच्यातरी पत्रकार परिषदेमुळे घाबरलेलं बघितलं. शिवसेना आम्हाला घाबरली कारण, त्यांच्या मनातच काळबेरं आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनीच जनसंपर्क विभागाला मनसेची पत्रकार परिषद रोखण्यास सांगितलं आणि पत्रकार कक्षालाच टाळं लावलं, अशा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.
दादरमधील शिवाजी पार्कच्या मुंबई महापालिकेच्या क्रीडाभवनाच्या जागेवर 2780 चौरस मीटरच्या जागेवर महापौर बंगला तयार करण्याचा विचार सुरु आहे. मात्र, या जागेवर क्रीडाभवन, मनोरंजन मैदानाचे आरक्षण आहे. परंतु राज्य सरकारने हे आरक्षण बदलून म्युनिसिपल हाऊन्सिंगचं आरक्षण टाकलं. या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी क्रीडाभवनाचे सभासद आहेत. या जागेवर बॅडमिंटन, कबड्डी, लॉन टेनिस, बुद्धिबळ, व्यायामशाळा इत्यादी मैदानी खेळ चालतात. मात्र, इथल्या जिमखान्याचं आरक्षण रद्द करुन जर महापौर बंगला बांधला जाणार असेल तर महापौर बंगल्याची एक वीटही आम्ही रचू देणार नाही, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.
महापौर बंगल्याचा विषय आज पत्रकार परिषदेत होता, म्हणूनच शिवसेना घाबरली आणि माझी पत्रकार परिषद रोखली, असाही दावा देशपांडेंनी केला.