मुंबई: तुम्ही जर मेट्रो प्रवास (mumbai metro) करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गुरुवारी, 19 जानेवारी रोजी घाटकोपर मेट्रो (Ghatkopar Andheri Metro) सायंकाळी 5.45 ते सायंकाळी 7.30 या दरम्यान बंद राहणार आहे. पीक अवरलाच मेट्रो बंद ठेवण्यात येणार असल्याने घरी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. काही ऑपरेशनल आणि प्रशासकीय कारणास्तव मेट्रो बंद करण्यात येणार असल्याचं मुंबई मेट्रो प्रशासनाच्या वतीनं सांगितलं आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी यावेळी त्यांच्या प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहनही मेट्रोकडून करण्यात आलं आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येणार असून ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमीपूजन करणार आहेत. यामध्ये मुंबई मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 या मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 


मुंबई मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मागील वर्षी करण्यात आले होते. दोन्ही मार्गिकेवरील एकत्रिपणे पहिल्या टप्प्यामध्ये 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आता मार्गिकेवरील दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून या मार्गिकेचे उद्घाटन होणार आहे.


मुंबई 'मेट्रो 2 ए'चा मार्ग (Metro 2A Route)


'मेट्रो 2 अ' हा  18.5 किमी लांबीचा आहे. दहिसर पश्चिम ते डीएन नगर स्थानकापर्यंत 'मेट्रो 2 अ' मार्ग असणार आहे. या मार्गात दहिसर पूर्व, अप्पर दहिसर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), धनुकरवाडी, वलणई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डीएन नगर अशी स्थानके असणार आहेत. 


'मेट्रो-7' मार्गावरील स्थानके (Metro 7 Route)


मेट्रो-7 मार्गावर 14 स्थानके असणार आहेत. दहिसर पूर्व, ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे , गोरेगाव पूर्व (महानंद डेअरी), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी पूर्व) या स्थानकांचा समावेश आहे.  पहिल्या टप्प्यात दहिसर पूर्व ते आरे दरम्यान मेट्रो सेवा सुरू आहे. 



ही बातमी वाचा: