Mumbai Metro 9: दहिसर-मिरा-भाईंदर मेट्रो-9 (Metro-9) या 13.6 किमी लांबीच्या या मार्गिकतील दहिसर-काशीगाव 4.5 किमी लांबीच्या मार्गिकवरील मेट्रो गाड्यांची चाचणी घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी मेट्रोमधील मोटरमॅनच्या कॅबीनमध्ये बसले होते. चाचण्या आणि उर्वरित काम पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र मिळवून डिसेंबरअखेर दहिसर-काशीगाव टप्पा-1 वाहतूक सेवेत दाखल करण्याचे मुंबई महानगर प्रेदश विकास प्राधिकरणाचे नियोजन आहे.
पहिला टप्पा 4.4 किमी लांबीचा असून दहिसर पूर्व ते काशिगाव हा पहिला टप्पा आहे. मेट्रो-9 मध्ये एकूण 8 स्थानक आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण चार स्थानके आहे. यामध्ये दहिसर पूर्व, पांडुरंग वाडी, मिरागाव आणि काशिगाव या स्थानकांचा समावेश आहे. मेट्रो 9 च्या पहिल्या टप्प्याचे जवळपास 96 % काम पूर्ण झाले आहे. मेट्रो-9 मुळे मीरा-भाईंदर, दहिसर या भागातील रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
मुंबई मेट्रो लाईन 9 मुळे उपनगरांमधील प्रवास अधिक जलद होणार-
मुंबई मेट्रो लाईन 9 (रेड लाईन) ही दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदर दरम्यानची एक महत्त्वाची मेट्रो लाईन आहे, जी मुंबईच्या पश्चिम उपनगरांना उत्तरेकडील उपनगरांशी जोडते. ही लाईन मेट्रो लाईन 7 ची विस्तारिका आहे आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) द्वारे विकसित केली जात आहे. मेट्रो लाईन-9 च्या कार्यान्वयनामुळे मुंबईच्या उपनगरांमधील प्रवास अधिक सुलभ, जलद आणि आरामदायक होईल. ही लाईन पश्चिम उपनगरांतील रहिवाशांसाठी एक महत्त्वाची सुविधा ठरेल. लाईन 9 चा मार्ग दहिसर (पूर्व) पासून सुरू होऊन मीरा रोड आणि भाईंदरमार्गे सुभाषचंद्र बोस स्टेडियमपर्यंत जातो. या मार्गावर विविध घनदाट वस्ती असलेल्या भागांना सेवा दिली जाईल.
मेट्रो-9 मधील स्थानके
पहिला टप्पा-
- दहिसर (पूर्व)- पांडुरंग वाडी- मिरगाव- काशी गाव
दुसरा टप्पा-
- साई बाबा नगर- मेडितिया नगर- शहीद भगतसिंग गार्डन- सुभाषचंद्र बोस स्टेडियम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
महामुंबई मेट्रो 9 चा चाचणी टप्पा आज पार पडतोय. या मेट्रो 9 मुळे मिरा भायंदर तसंच मुंबई हून येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप फायदा होईल. काशीगाव ते दहिसर असा हा टप्पा आहे. सिमलेस कनेक्टिविटी आपल्याला करायची आहे. एमएमआर रिजनमध्ये पहिल्यांदा डबल चेंबर ब्रिज देखील तयार करण्यात आलं आहे. मेट्रो आणि गाड्यांचा ब्रिज एकाच स्ट्रक्चरमध्ये पहायला मिळेल. मोठी वाहतूक कोंडी यामुळे कमी होईल. याचेच एक्सटेंशन विरारपर्यंत होणार आहे. सर्व मेट्रो आपापसात जोडल्या जात आहेत. अधिक वेगाने आता काम करु, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 2027 च्या शेवटापर्यंत ही सर्व कामे होतील, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.