Kishori Pednekar on Mumbai Mayor: भाजपनं मुंबईत महापौरपदाचा उमेदवार मराठी दिला असल्याने आम्ही अपशकून करणार नाही, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटानं घेतली असल्याची प्रतिक्रिया गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली. आम्हाला आकड्यांची गणित मान्य असतात आणि ती मान्य केली असल्याचे त्यांनी सांगितले. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून आम्ही त्याच भूमिकेत आहोत. कुठल्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता पार पाडू. प्रत्येक नगरसेवक आपापल्या विभागातील जे काही प्रश्न आहेत ते सक्षमपणे मांडतील, अशी ग्वाही पेडणेकर यांनी दिली. त्यांनी नमूद केले की, विरोधी पक्षाची भूमिका त्यांच्यासाठी नवीन नाही. त्या म्हणाल्या, आम्ही जसं सत्तेत असतानाही अनेकदा आम्हाला विरोधी पक्षांच्या पण भूमिका बजाव्या लागलेल्या आहेत, आता तर आम्ही त्याच भूमिकेत आहोत. 

शिस्तबद्ध कामाची ग्वाही

विरोधी पक्षाची जबाबदारी त्या कशा प्रकारे पार पाडतील यावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, ती आम्ही भूमिका पद्धतशीर आणि नेटाने पार पाडू. केवळ एक व्यक्ती म्हणून नव्हे तर संपूर्ण पक्ष म्हणून भूमिकेवर भर देताना त्या म्हणाल्या की, सक्षम विरोधी म्हणून आम्ही काम करू.

रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. तर उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाकडून संजय शंकर घाडी यांची निवड जाहीर करण्यात आली. संजय घाडी पुढील सव्वा वर्षे उपमहापौर म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.भाजपकडून महापौरपदासाठी रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. मात्र अखेर रितू तावडे यांनी बाजी मारली. यंदा मुंबई महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. मुंबई मनपाची महापौर निवडणूक 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे. रितू तावडे या भाजपच्या मुंबईतील पहिल्या महिला महापौर ठरणार आहेत.

नावाची घोषणा होताच रितू तावडे काय म्हणाल्या?

महापौरपदी निवड झाली असली तरी मी स्वतःला मुंबईची सेवक मानते. महापौरपद कोणाला मिळणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. मुंबईच्या हितासाठी सर्व नगरसेवक निवडून आले आहेत. सभागृहाची गरिमा जपत, पक्षभेद विसरून निर्मळ आणि प्रामाणिक काम व्हावं, हीच माझी अपेक्षा आहे. दरम्यान, मुंबई मनपामध्ये उपमहापौरपद शिवसेना शिंदे गटाकडे जाणार आहे. शिंदे गटाकडून संजय शंकर घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी संजय घाडी यांचा कार्यकाळ सव्वा वर्षांचा असेल, असं स्पष्ट केलं.

इतर महत्वाच्या बातम्या