Ritu Tawde Mumbai: मुंबईतील पहिल्याच पावसात ठिकठिकाणी पाणी तुंबल्यानंतर दौऱ्यासाठी बाहेर पडलेल्या महापौर रितू तावूडे यांच्या दौऱ्यावेळी त्यांच्या शेजारीच एक व्यक्ती मॅनहोलमध्ये पडला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेची (BMC) चांगलीच नाचक्की झाली होती.  गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधारी भाजपकडून मुंबईतील नालेसफाई व्यवस्थित झाल्याचा दावा केला जात आहे. महापौर रितू तावडे (Ritu Tawde) यामध्ये अग्रस्थानी आहेत. मात्र, पहिल्याच पावसानंतर (Mumbai Rain) शहरात काही भागांमध्ये मॅनहोलची झाकणं उघडी असल्याचे समोर आले होते. यावरुन  टीका सुरु होताच महापौर रितू तावडे यांनी मुंबईत दौरा केला होता. (Mumbai News)

मुंबईतील गांधी मार्केट परिसरात पाहणी करत असताना महापालिकेचा मुकादम उघड्या ड्रेनमध्ये पडल्याच्या घटनेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महापौर रितू तावडे यांनी ही घटना संशयास्पद वाटत असल्याचे सांगत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. पावसामुळे पाणी साचलेल्या परिसराची पाहणी करत असताना महापालिकेचे मुकादम बाबन जाधव हे उघड्या ड्रेनमध्ये पडले होते. मात्र, ते नेमके कशामुळे आणि कशा परिस्थितीत पडले, याची तपासणी आता केली जाणार आहे. घटनास्थळी उपस्थित कर्मचारी, अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले जाणार असून ड्रेन उघडा का होता, सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याचीही चौकशी होणार आहे.

Ritu Tawde: चेंबरमध्ये मुकादम पडल्याप्रकरणी महापौरांना संशय का ?

मुंबईत महापौर पाहणी करत असताना मनपाचा मुकादम उघड्या ड्रेनच्या चेंबरमध्ये पडल्याच्या प्रकारावर आता प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेबाबत महापौरांना काही बाबी संशयास्पद वाटत असून त्यातूनच चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी ड्रेनचं चेंबर उघडं होतं त्या ठिकाणी आधीच बॅरिकेटिंग लावण्यात आलं होतं. त्यामुळे नागरिक आणि कर्मचारी देखील त्या भागातून न जाता बाजूने फिरून जात होते. मात्र संबंधित मुकादमाने बॅरिकेटिंग बाजूला करून त्याच ठिकाणाहून प्रवेश केला. जर तो मुकादम त्या कामाशी संबंधित होता, तर त्याला चेंबर उघडं असल्याची माहिती असणे अपेक्षित होते. त्यामुळे बॅरिकेटिंग असूनही तो त्या ठिकाणी कसा गेला, याबाबत महापौरांनी संशय व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून नेमकी चूक कुठे झाली, बॅरिकेटिंग का हटवण्यात आली आणि संबंधित व्यक्ती तिथे कशी पोहोचली याचा तपास करण्यात येणार आहे. आणखी वाचा Mumbai Rain Ritu Tawde: इकडे महापौर रितू तावडे नालेसफाईचं कौतुक सांगत होत्या अन् मागे BMC चा अधिकारीच मॅनहोलमध्ये पडला