मुंबई :रुग्णालये (Hospital) म्हणजे सर्वसामान्यांना छळणारा, लुटणारा पांढरपेशी गुन्हेगारांचा अड्डाच बनलाय अशी संतप्त ओरड नागरिक आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून सातत्याने होत असते. सरकारकडून लाखोंच्या रुग्णसेवा मोफत दिल्या जाण्याच्या घोषणा होतात, पण अंमलबजावणी मात्र शून्य असते. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका आमदाराच्या पी.ए.च्या पत्नीचा रुग्णालयाच्या हलगर्जीपणातून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतील (Mumbai) मसिना हॉस्पिटल या धर्मादाय नोंदणीकृत रुग्णालयाने माणुसकीला काळिमा फासण्याचं काम केलंय. एका महिला पत्रकाराच्या वडिलांचे निधन झाले असता पैसा आणि प्रोसेस अभावी तब्बल 8 तास रुग्णालय प्रशासनाने मृतदेह अडवून ठेवल्याची संतापजनक घटना घडली. त्यामुळे, संवेदनाहीन ट्रस्टच्या नावाखाली भ्रष्ट बनलेल्या रुग्णालयात पुन्हा एकदा माणुसकी मेल्याचं प्रदर्शन झालं. याप्रकरणी, तीव्र संतापानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले आहेत. 

मुंबईतील एबीपी माझाच्या महिला पत्रकाराचे वडील महेश भालेराव यांना 8 जानेवारी रोजी मसिना हॉस्पिटल ट्रस्टमध्ये ॲडमिट करण्यात आले होते. पण, उपचारादरम्यान 10 जानेवारीला पहाटे 3.30 वाजता त्यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनाने आधीच दु:खात असलेल्या भालेराव कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम मसिना रुग्णालयाने केलंय. कारण, पैसे आणि डॉक्युमेंट प्रोसेसच्या नावाखाली हे रुग्णालय तब्बल 8 तास मृतदेह देण्यास नकार देत राहिले. याबाबत सातत्याने विनंती करुनही रुग्णालयाने मृतदेह देण्यास नकार दिला. त्यामुळे, रुग्णालयाच्या ट्रस्टी कविता पै. यांना भेटण्याच्या विनंती केली, पण त्यांनीही भेट दिली नाही. 

वडिलांच्या जाण्याच्या अचानक बसलेल्या धक्क्यातून घरी कर्ता पुरुष नसल्याने महिला पत्रकार एकट्याच सगळी प्रोसेस करत होत्या. तरीही रुग्णालयाने माणुसकी न दाखवता इकडून तिकडे फेऱ्या मारायला लावल्या. वडिलांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी वाट पाहावी लागली ही संतापजनक घटना घटना आहे. आमदाराच्या पीएवर, एखाद्या पत्रकारावर अशी वेळ येत असेल तर सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तर, केवळ माध्यमांत बातम्या आल्यानंतरच आमदार, खासदार, मंत्री आणि सरकार लक्ष देणार का? संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांचा रुग्णालयांवर वचक नाही का, ते काय करतात? असा सवाल यानिमित्ताने पुढे आला आहे.  

महिला पत्रकाराची चॅरिटी कमिश्नरकडे तक्रार

विशेष म्हणजे, पेशंटला रुग्णालयात दाखल केल्यानंतर 9 जानेवारीच्या रात्री 10 वाजता आधी 3 लाख भरा तरंच ऑपरेशन होईल, असेही सांगण्यात आले होते. त्यानुसार, आपले वडिल लवकर बरे व्हावेत म्हणून कुटुंबीयांनी काही पैसे भरलेही, पण माणूस हातचा गेला आणि कुटुंबाची हेळसांड झाली हे सहन करण्यासारखे नाही, असे म्हणत महिला पत्रकाराने मुख्यमंत्री कार्यालय आणि चॅरिटी कमिशनर, मुंबई यांच्याकडे घडल्या प्रकाराबाबत तक्रारही नोंदवली आहे. मात्र, मुर्दांड झालेल्या रुग्णालय प्रशासनाला कुठेतरी जरब बसवणे गरजेचं आहे, अन्यथा सरकारच्या घोषणांवरुनही सर्वसामान्यांचा विश्वास उडायला वेळ लागणार नाही.