हा फ्रीज साधासुधा नाही, तर गरजूंची भूक भागवणारा माणुसकीचा फ्रीज आहे. मुंबईतल्या वर्सोव्याच्या वाडेश्वर मंदिरात एक फ्रीज बसवण्यात आला आहे. जिथं लोक पदार्थ ठेवण्यासाठी गर्दी करत आहेत.
कुणीही यावं... पदार्थ ठेवावा... कुणीही यावं... फ्रीजमधला पदार्थ घ्यावा... आणि खावा... अन्नाचा एक-एक दाणा वाचवण्याच्या मोहिमेची सुरुवातही एका बातमीनं झाली.
परिस्थितीमुळे ज्यांना हात पसरायला लागायचे, त्यांना आता फक्त या फ्रीजचं दार उघडायचं आहे. घरात राहिलेलं अन्न, हॉटेलमधले पदार्थ, लग्न समारंभात राहिलेलं अन्न, पार्ट्यांमधले अन्न आता थेट या फ्रीजमध्ये येऊ लागलं आहे.
पोटाची आग माणसाला वाट्टेल ते करायला लावते... पण या फ्रीजनं भीक मागण्यापेक्षा सन्मानानं खाण्याची संधी दिली आहे.
आपल्या घरातही रोजच्या रोज किती अन्न वाया जातं, एकदा नक्की पाहा. वाया जाणाऱ्या अन्नामध्ये किती भुकेलेल्यांची भूक भागेल याची कल्पना करा. जे वर्सोव्यात झालं, ते तुमच्या गावात झालं तर किती लोकांची भूक भागेल याचाही विचार करा. गावागावात माणुसकीची भिंत सुरु झालीच आहे, माणुसकीचा फ्रिजही सुरु करायला हरकत नाही.