मुंबई : मुंबईतील साकीनाका भागात राहणाऱ्या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याच्या दोन आठवड्यांनंतर आणखी एक थरारक गोष्ट उघडकीस आली आहे. संबंधित महिलेचा मृतदेह कारमध्ये 'बसवून' तिच्या पतीने बोरीवलीपर्यंत प्रवास केल्याची माहिती आहे.

26 वर्षीय मणी पुरोहितने गळफास घेतल्यानंतर साकीनाका पोलिसांनी तिचा 28 वर्षीय पती सुखरामविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. मात्र मणीच्या मृत्यू प्रकरणाचं गूढ आता वाढलं आहे.

मणीचा मृतदेह गाडीच्या मागच्या सीटवर 'बसवून' सुखरामने अंधेरीतील साकीनाक्याहून बोरीवलीला नेल्याचा फोटो समोर आला आहे. मणीचा चेहरा झाकण्यासाठी सुखरामने तिच्या चेहऱ्यावर साडीचा पदर ठेवल्याचं दिसत आहे. हा फोटो मणीच्या नातेवाईकांनी काढल्याची माहिती आहे.

पोलिसांना माहिती न देताच मणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा सुखरामचा डाव होता. पत्नीच्या अनैसर्गिक मृत्यूनंतरही पोलिसांना कळवण्याची तसदी सुखरामने न घेतल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आहे. त्याचप्रमाणे अॅम्ब्युलन्सऐवजी नातेवाईकांच्या गाडीतून त्याने पत्नीचा मृतदेह नेल्यामुळेही गूढ वाढलं आहे.

नातेवाईकांच्या जबाबानुसार सुखरामवर कलम 306 अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुखरामला 7 जून रोजी अटक करण्यात आली आहे. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

6 जून रोजी शताब्दी रुग्णालयातून साकीनाका पोलिस स्टेशनला फोन आला होता. एका खाजगी वाहनातून मृत महिलेला रुग्णालयात आणल्याची माहिती देण्यात आली होती. गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचं डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालात समोर आलं होतं.

सुखराम कपड्यांच्या दुकानात नोकरी करतो. 'रात्री एक वाजता घरी गेल्यावर आपल्याला पत्नी मृतावस्थेत आढळली होती. त्यामुळे दोघा सहकाऱ्यांना मदतीसाठी बोलावलं आणि नातेवाईकांची गाडी मागवली. एका खाजगी रुग्णालयात नेलं तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं आणि सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.' असं सुखरामने सांगितल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली.

सरकारी रुग्णालयात नेण्याऐवजी सुखरामने तिचा मृतदेह गाडीच्या बॅकसीटवर बसवला. त्याचे दोन सहकारी दोन बाजूंना बसले. तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिघांनी बोरीवलीच्या दिशेने गाडी पळवली. मात्र बोरीवलीत नातेवाईकांनी हा प्रकार पाहताच ते चकित झाले आणि तिला शताब्दी रुग्णालयात घेऊन गेले.

मणी आणि सुखराम यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली होती. दोघांच्या संसारात काही कुरबुरी सुरु होत्या आणि मणीच्या कुटुंबीयांनाही याबाबत कल्पना होती. तिच्या मृत्यूमुळे नातेवाईकांना धक्का तर बसला आहेच, पण ज्याप्रकारे तिच्या मृतदेहासह त्याने प्रवास केला, ते पाहता संशयाचं धुकं निर्माण झाल्याचं नातेवाईक सांगतात.