मुंबई : शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा वाग्युद्ध रंगणार आहे. आणि त्याला कारण ठरणार आहे मुंबई महापालिकेचं विरोधी पक्षनेते पद. पहारेकराची भूमिका सोडलेल्या भाजपनं महापालिकेत विरोधी पक्षनेते पदाचा दावा केला. मात्र महापौर किशोरी पडणेकर यांनी भाजपचा दावा फेटाळून लावलाय. याविरोधात सभागृहाबाहेरच भाजपनं ठिय्या आंदोलन केलं. शिवसेना-भाजपची युती तुटल्यानं महापालिकेत पहारेकराच्या भूमिकेत असलेल्या भाजपनं विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतलेला. त्यासाठी प्रभाकर शिंदेंचं नावंही पुढे करण्यात आलेलं. मात्र महापौरांनी ही शिफारस फेटाळली.
त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपा नगरसेवकांनी महापौरांचा निषेध करीत सभागृहाबाहेर ठिय्या मांडत महापौर हाय हाय अशा घोषणा देत पालिका दणाणून सोडली. याप्रकरणी वेळ आली तर न्यायालयात जाण्याचा इशारा भाजपने दिला आहे. त्यामुळे विरोधी नेतेपदाचा वाद चिघळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समीकरण बदलते आहे. याचा परिणाम आता मुंबई महापालिकेतही दिसायला सुरुवात झाली आहे. भाजपने 2017 च्या निवडणुकीनंतर पालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असूनही विरोधी पक्षनेतेपदावरचा दावा सोडला होता. पालिकेतील समित्यांमधील कोणतेही पद न स्वीकारता पहारेकऱ्यांची भूमिका घेतली.
मात्र आता राजकीय समीकरणे बदलायला लागल्याने भाजपने तीन वर्षानंतर पालिकेत विरोधीपक्ष नेतेपदावर दावा केला आहे. 28 फेब्रुवारी रोजी तसे पत्रही महापौर किशोरी पेडणेकर यांना दिले. या पत्रात विरोधीपक्ष नेतेपदी व गटनेते पदावर नगरसेवक प्रभाकर शिंदे यांची निवड केली असून त्यांच्या नावाची सभागृहात घोषणा करावी अशी मागणी भाजपने पत्रात केली होती.
त्यानुसार गुरुवारी पालिका सभागृहात महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या गटनेतेपदावर प्रभाकर शिंदे यांनी निवड झाली असल्याचे घोषित केले. मात्रा विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा 2017 ला करण्यात आली असल्याचे सांगत भाजपचा विरोधीपक्षनेतेपदाचा दावा महापौरांनी फेटाळून लावला. यावेळी आक्रमक झालेल्या भाजपने यावर हरकतीचा मुद्दा मांडून चर्चा करण्याची मागणी केली, मात्र या मागणीकडे महापौरांनी दुर्लक्ष करून गदारोळातच कामकाज सुरु ठेवले. त्यामुळे संतापलेल्या भाजपने उभे राहून जोरदार घोषणाबाजी केली. चर्चा करू न दिल्याने भाजपने सभात्याग करीत सभागृहासमोर ठिय्या मांडला.
दरम्यान पालिकेत विरोधीपक्षनेते पद आधीच जाहीर करण्यात आले असल्याने त्या पक्षाने हे पद सोडल्यानंतरच भाजपला दावा करता येऊ शकतो, या या नियमाचा आधार घेत शिवसेनेने भाजपची कोंडी केली आहे. याविरोधात भाजप आक्रमक झाली असून येत्या काळात यावरून शिवसेना - भाजपमध्ये चांगलीच जुंपणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते पदाचा भाजपचा दावा महापौरांनी फेटाळला, सभागृहात भाजपचा गोंधळ
मनश्री पाठक, एबीपी माझा
Updated at:
05 Mar 2020 08:26 PM (IST)
भाजपनं प्रभाकर शिंदे यांच्या नावाची विरोधी पक्ष नेते पदासाठी आणि गटनेतेपदासाठी शिफारस केली होती. मात्र, महापौरांनी काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता यापूर्वीच नेमला असल्यानं विरोधी पक्षनेता नेमता येणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -