Magathane Dahi Handi : मुंबईतील मराठी शाळा टिकवण्यासाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री फोडणार मातीची हंडी! माघाठाण्यात रंगणार गोविंदांचा थरार
Magathane Dahi Handi 2026: माघाठाण्यात आमदार प्रकाश सुर्वे यांनी 'मातृभाषा शिक्षण जागर दहीहंडी'चे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

Magathane Dahi Handi Festival : मुंबईतील मराठी शाळा टिकवण्यासाठी आणि मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी बोरीवलीतील माघाठाणे येथे भव्य ‘मातृभाषा शिक्षण जागर दहीहंडी’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. माघाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि युवासेना सचिव नगरसेवक राज प्रकाश सुर्वे यांच्या पुढाकाराने शिवसेना व तारामती फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा दहीहंडी उत्सव रंगणार आहे.
महाराष्ट्राच्या मातीत फुललेल्या मराठी संस्कृतीचा सुगंध तरुणाईत दरवळावा आणि मराठी भाषेची अस्मिता टिकून राहावी, हा या अभिनव संकल्पनेमागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री फोडणार मातीची हंडी
या दहीहंडी महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावणार आहेत. या महोत्सवात एक हंडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर दुसरी हंडी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फोडणार असल्याची माहिती आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिली आहे. याशिवाय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ५ सप्टेंबर रोजी म्हणजेच शिक्षक दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमात गुणवंत शिक्षकांचा विशेष सन्मानही केला जाणार आहे.
संजय दत्त, अनिल कपूरसह बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती
शनिवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी बोरीवली (पूर्व) येथील एक्सप्रेस हायवेजवळील देवीपाडा मैदानावर सकाळी १०.०० ते रात्री १०.०० या वेळेत गोविंदांचा थरार रंगणार आहे. या महोत्सवात बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते संजय दत्त, अनिल कपूर, रवी किशन, राकेश बेदी तसेच मल्लिका शेरावत आणि मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज अभिनेते, अभिनेत्री व गायक हजेरी लावणार आहेत. महोत्सवात मराठी व हिंदी वाद्यवृंद आणि लोकनृत्याचे खास कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
Dahi Handi Cash Prizes : गोविंदा पथकांसाठी आकर्षक बक्षिसांची खैरात
या दहीहंडी महोत्सवात सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला थरांनुसार आकर्षक रोख बक्षिसे दिली जाणार आहेत:
५ थर: ₹५,०००
६ थर: ₹७,०००
७ थर: ₹९,०००
८ थर: ₹३०,०००
९ थर: ₹१,२५,०००
याव्यतिरिक्त विशेष प्रात्यक्षिके आणि मनोरे सादर करणाऱ्या पथकांना ₹१०,००० ते ₹१,००,००० पर्यंतची रोख पारितोषिके दिली जातील. महिला गोविंदा पथकांसाठीही विशेष बक्षिसे आणि प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे.
दहीहंडी फोडणाऱ्या थरातील गोविंदांच्या शिक्षणाचा खर्च सुर्वे उचलणार
या दहीहंडी महोत्सवाचे सर्वात मोठे आणि वेगळे वैशिष्ट्य म्हणजे, दहीहंडी फोडणाऱ्या शेवटच्या थरातील सर्व गोविंदांचा पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च आमदार प्रकाश सुर्वे आणि नगरसेवक राज सुर्वे स्वतः उचलणार आहेत. न्यायालयाच्या निर्णयाधीन राहून आणि सर्व नियमांचे पालन करून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
ही बातमी वाचा:
Before You Go
Gunratna Sadavarte On Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस





















