Mumbai Local Megablock : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर आज प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. आज रविवारी सकाळी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. तर, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कोणताही मेगाब्लॉक नसणार. तर, पश्चिम रेल्वेने रविवारी पहाटेच्या 4.30 वाजण्याच्या सुमारास मेगाब्लॉकची कामे पूर्ण केलीत. तर, रविवार असल्यामुळे आज धावणाऱ्या लोकलची संख्या काही प्रमाणात कमी असणार आहे. 


रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी दर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. या ब्लॉक दरम्यान लोकल गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होते. काही लोकल रद्द करण्यात येतात. 


>> आज हार्बर मार्गावर कुठे असणार मेगाब्लॉक


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉकच्या कामानिमित्त चुनाभट्टी/वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप मार्गावरील लोकल  सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत बंद असणार आहे. 


तर,  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई व वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहे. 


पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद असणार आहे. तर, गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. 


विशेष लोकल :


या मेगाब्लॉकच्या कालावधीत कुर्ला येथील प्लॅटफॉर्म क्रमांक आठवरून पनवेलसाठी विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. त्याशिवाय, मेगाब्लॉकच्या कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरून आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.